दत्त आरती - अनसूयानंदना तुज ओवाळूं आरती
अनसूयानंदना तुज ओवाळूं आरती । अनसूयानंदना मज निज चरणीं दे रति ॥धृ.॥
सर्वात्मा तूं असोनी निजशी बा माहुरी । करिशीं तूं स्नान नित्य प्रेमें काशीपुरीं । निजदासा भेट द्याया भिक्षा कोल्हापुरीं । वससी या विश्वासा सह्याद्रीगिरीवरी । अनसूयानंदना ॥१॥
निज भजकां भेट देसी निजनामोच्चरणें । कलिमाजीं बाहती तुज दत्ता या कारणें । जाणुनि हें तुजपाशीं केलें म्यां गार्हाणें । निजचरणा दावि त्याहुनि नच दुसरें मागणें । अनसूयानंदना ॥२॥
पतिरूपा घेऊन तूं वससी कृष्णातटीं । निजदासा उद्धराया जागृत तूं संकटीं । प्रत्यक्ष गाणगापुरीं दिससी दासा मठीं । समजुनि हें वासुदेव तुज जोडी करपुरी । अनसूयानंदना तुज ओवाळूं आरती । अनसूयानंदना मज निज चरणीं दे रति ॥३॥