1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (18:07 IST)

खाद्यतेलाच्या किमतीत वाढ ,दोन आठवड्यात 25 टक्क्यांनी भावात वाढ

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारताच्या बाजारपेठांवरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम थेट भारतीय बाजारपेठेत  दिसून येत आहे. गेल्या दोन आठवड्यात देशात खाद्यतेलाच्या किमती 15-25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारत रशिया आणि युक्रेनमधून 90 टक्क्यांहून अधिक सूर्यफूल तेल आयात करतो. आज या तेलाच्या देशात सर्वाधिक भाव वाढताना दिसत आहेत. मात्र, सध्या मोहरी तेलाचे दर नरमले आहेत. कारण यंदा मोहरीचे पीक जास्त प्रमाणांत आहे. सतत वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सध्या बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.

देशात गेल्या दोन आठवड्यांपासून घाऊक बाजारात आरबीडी पाम तेलाचा भाव 130 रुपयांवरून 157 रुपये, कच्च्या पाम तेलाचा भाव 128 रुपयांवरून 162 रुपये प्रतिकिलो झाला आहे. देशी तेलांमध्ये सोयाबीन रिफाइंड 131 रुपयांवरून 160 रुपये, सूर्यफूल तेल 130 रुपयांवरून 165 रुपये, शेंगदाणा तेलाचा भाव 135 रुपयांवरून 157 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर मोहरीच्या तेलाचे दर 165 रुपयांवरून 152 रुपये किलोवर आले आहेत.
 
भारत खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मुख्य खाद्यतेल उत्पादक देश मलेशिया आणि इंडोनेशिया यांनी त्यांच्या किमती वाढवल्या आहेत. युक्रेनमधून देशाला होणारा सूर्यफूल तेलाचा पुरवठा सध्या युद्धामुळे थांबला आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत तेलाच्या किमतीवरही झाला आहे. दोन आठवड्यात देशी तेलाच्या दरात किलोमागे 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या खाद्यतेलाच्या महागाईत फारसा दिलासा मिळण्याची अपेक्षा नसल्याचे खाद्यतेल व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.