मंगळवार, 5 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (16:21 IST)

केसर : जगातील सर्वात महागड्या मसाल्याची घरातल्या घरात अशी शेती करा

रियाज मसरूर
 'एका हंगामात पाच लाख रुपये कमावण्यासाठी तुम्हाला जाफरान म्हणजेच केसराच्या बीया, एक रिकामी खोली, काही रॅक आणि काही प्लास्टिकचे कंटेनर याची गरज असते.'
 
जम्मू काश्मीरच्या बडगाममधील पखरपुरा गावात राहणारे कंप्युटर इंजिनीअर राशीद खान यांचं हे मत आहे. पण मुळात केसराची शेती करणं हा राशीद यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय नाही किंवा पखरपुरा मधली जमीनही त्यासाठी उपयुक्त नाही.
 
केसर दूध आणि काहवा यात वापरलं जातं. तसंच ते कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स आणि अनेक प्रकारच्या औषधांमध्येही वापरलं जातं. पण गेल्या काही वर्षांपासून इथं केसराचं उत्पादन प्रचंड घटलं आहे. अनेक शेतकऱ्यांची जमीनही नापिक झाली आहे.
 
भारतीय प्रशासित काश्मीरमध्ये केसराची शेती प्रामुख्यानं पुलवामाच्या पामपूर भागातील पठारांवर होते. जगातील सर्वात महागडा मसाला म्हणून ओळख असलेल्या केसरच्या शेतीचं घटलेलं प्रमाण पाहून, राशीद खान यांनी त्यांच्याच घराच्या एका खोलीत केसर शेतीचा प्रयोग केला.
 
"केसराचं उत्पादन कमी होत असल्याबाबत, मी रोज टिव्हीवर ऐकायचो आणि वृत्तपत्रांमध्ये वाचायचो. मी त्यावर विचार केला आणि याठिकाणच्या कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशी संपर्क साधला. आम्ही बीया खरेदी केल्या आणि आज केसराची शेती फुलली असल्याचं तुम्ही पाहू शकता," असं राशीद म्हणाले.
 
केसराची शेती घरातच पिकवून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येऊ शकतं आणि त्यासाठी मोठ्या शेतांचीही गरजही नाही, असंही राशीद सांगतात.
 
"यात फार काही कष्ट लागत नाहीत. फक्त तापमानाची काळजी घ्यावी लागते आणि जर आर्द्रता कमी झाली तर शिंपडा मारून ती आर्द्रता कायम राखावी लागते. यातून पैसाही मिळतो आणि आपलं सर्वात महत्त्वाचं पिक नष्ट होत नसल्याचं समाधानही मिळतं," असंही ते म्हणाले.
 
मोठ्या प्रमाणावर शेती करण्याची तयारी
पामपूरचे राहणारे अब्दुल मजीद यांचं कुटुंब तीन शतकांपासून केसराची शेतीच करतं. पण गेल्या काही वर्षांदरम्यान बदललेलं हवामान आणि प्रदूषण यामुळं केसराच्या शेतीला आता पूर्वीसारखं वैभव राहिलेलं नाही.
 
गेल्या दोन दशकांमध्ये केसराच्या उत्पादनात 60 टक्के घट झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अब्दुल मजीद स्वतःदेखील आता 'इनडोअर फार्मिंग' च्या माध्यमातून घरातच केसराचं उत्पादन घेतात आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहीत करतात.
 
"हवामानानं त्रास दिला तर आम्ही इनडोअर फार्मिंगचा अवलंब केला. पण सुरुवातीला या प्रयोगात अनेकदा लाखो रुपयांची बीयाणे खराब झाली होती," असं त्यांनी सांगितलं.
 
"नंतर आम्ही कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं आणि मदतही केली. आता कोणत्याही शेतकऱ्याला त्यांच्या खोलीत केसराची दोन किलोपर्यंतची शेती करता येते. त्याचे मूल्य सहा लाख रुपयांपर्यंत असेल," असंही ते म्हणाले.
 
अब्दुल मजीद यांनी ते काही भारतीय कंपन्यांच्या संपर्कात असल्याचंही सांगितलं.
 
"आम्ही चर्चा करत आहोत. आम्ही जमीन उपलब्ध करून देणार आणि ते मोठे ग्रीन हाऊस तयार करतील. मग हवामान कंसंही असलं तरी त्याचा पिकावर परिणाम होणार नाही. त्याला काही काळ लागेल, पण तोपर्यंत शेतकरी घरातही याची शेती करू शकतात," असं मजीद म्हणाले.
 
नव्या प्रयोगाचा प्रयत्न
शरद ऋतू किंवा पानगळ सुरू होताच पामपूरच्या शेतांमध्ये बहर आलेला असायचा. सगळीकडं केसराच्या सुंदर फुलांमुळं मनमोहक असं वातावरण झालेलं असायचं. पण आता त्या शेतांमध्ये तसं वैभव पाहायला मिळत नाही. कारण हवामानातील बगलामुळं उत्पादन अत्यंत कमी होतं.
 
कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक बशीर अहमद इलाही यांनी याबाबत माहिती दिली. "आम्ही शेतांमध्ये केसराची शेती बंद करत आहोत असं नाही. तर उलट आम्ही हवामानातील बदलाशी दोन हात करण्याचा मार्ग शोधला आहे. त्यामुळं शेतकरी यशस्वीपणे इनडोइर फार्मिंग करत आहेत," असं ते म्हणाले.
 
केसराचं बी (कॉर्म) अनेक वर्ष पिक देतं. पण केसराचं फूल तोडल्यानंतर पुढच्यावर्षी ते पुन्हा पिकासाठी सज्ज व्हावं म्हणून ते पुन्हा जमिनीतच ठेवावं लागतं.
 
प्राध्यापक बशीर अहमद इलाही म्हणतात की, "आम्ही आता आणखी एक प्रयोग करणार आहोत. त्यात इनडोइर फार्मिंगच्या माध्यमातून केसराच्या बीचंही उत्पादन करून त्याचं संवर्धनही करता येईल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर जमिनीची गरज फारशी राहणार नाही आणि कुणालाही त्यांच्या घराच्या खोलीमध्ये केसराची शेती करता येईल."
 
प्राध्यापक बशीर यांच्या मते, भारतातील अनेक राज्यांचे कृषी शास्त्रज्ञ याठिकाणी येऊन इनडोअर फार्मिंगमधील शक्यतांचा अभ्यास करत आहेत.
 
"पण काश्मीरसारखं वातावरण प्रत्येकठिकाणी मिळू शकत नाही. मुंबई किंवा दिल्लीत असं करायचं असेल तर खोलीचं तापमान कायम नियंत्रित राहण्यासाठी, खूप उपकरणं लावाली लागतील," असंही ते म्हणाले.