बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. मनाचिये गुंती
Written By वेबदुनिया|

मजबूत मन हेच सामर्थ्य

ND
एखाद्या शास्त्रीय नर्तिकेचा अपघातात एक पाय निकामी होऊनही तिची नृत्याची जिद्द कमी होत नाही. ती नकली पाय बसवून व्यासपीठावर नाचते. एखाद्या क्रिकेटपटूने चांगला खेळ केला तरीही त्याला संघाबाहेर जाण्याचा रस्ता दाखविला जातो. परंतु, तो हार न मानता पुन्हा संघात दाखल होतो. एका महान चित्रपट निर्मात्याच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला दर्शकांनी नकार दिल्यानंतर तो पुन्हा एक चित्रपट निर्माण करतो आणि तो चित्रपट इतिहास घडवितो किंवा मैलाचा दगड ठरतो.

असे नेहमीच होते. कारण जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणचे कमजोर मनाचे आणि दुसरे म्हणजे मजबूत मन असलेले. कमजोर मन असणार्‍या लोकांमध्ये संकटाचा सामना करण्याचे धाडस नसते. त्यामुळे ते अधिकधिक कमजोर होऊन तक्रार करणे, रडणे यामुळे अयशस्वी होतात. मात्र आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍याच्या माथ्यावर फोडण्यासाठी कारणे शोधतात.

मजबूत मन असणारे लोक असे नसतात. ते प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करतात. टीकाकारांनी केलेली टीका त्यांचे मन बदलू शकत नाही. ते आपली हिंमत गमावत नाहीत, ते तक्रार करत नाहीत. ते प्रत्येक घटनेचा सकारात्मक बाजूने विचार करून एक दिवस यशस्वी होतात. कारण, त्यांच्यामध्ये संकटाच्याकाळी आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा असते. ते जीवनातील प्रत्येक आव्हानाचा अधिकाधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात.

आपण यापैकी कसे आहात आणि कसे बनू इच्छिता, ते ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. कारण, जीवनात प्रत्येकाला एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे, आपण साहसी बनू इच्छिता की भित्रे? सकारात्मक विचार करणारा कधीच भित्रा बनू शकत नाही. कारण, त्याचा स्वत:वर, जीवनावर आणि ईश्वरावर विश्वास असतो. ते उच्च विचारशक्ती आणि आत्मविश्वासाने आपले काम करतात. असे लोक आपल्यासाठी काम करतातच पण त्यांच्यामुळे देश आणि समाजाची प्रगती होत असते. असेच लोक देश आणि समाजाची अनमोल संपत्ती असतात. म्हणून नेहमी आपले मन मजबूत ठेवा. कारण, ए. पी. जे. अब्दुल कलाम, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडूलकर या महान लोकांनी जन्म घेतला नसता तर एवढे मोठे कर्म त्याच्या हातून झाले नसते.