पृथ्वीवर एकूण खंड किती आहेत? अनेकजण या प्रश्नाचं उत्तर 'सात' असं देतील. गुगल आणि इंटरनेटवरसुद्धा जगात सातच खंड असल्याची माहिती मिळेल.
पण 2017 मध्ये भूगर्भशास्त्रज्ञांच्या एका गटाने झिलँडिया या आठव्या खंडाचा शोध लागल्याची घोषणा केली.
आता तुम्हाला वाटत असे की 2017 ची ही घटना मी तुम्हाला पुन्हा एकदा का सांगतोय? तर आता शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरच्या या आठव्या खंडाचा नकाशा नुकताच प्रकाशित केलाय. त्यामुळे नेमका हा खंड आहे तरी काय? झिलँडिया हे नाव त्याला कसं पडलं? सध्या हा खंड कुठे आहे?
झिलँडिया कुठे आहे?
शास्त्रज्ञांचं असं मत आहे की झिलँडिया खंडाचा 94 टक्के भाग हा समुद्रात बुडालेल्या अवस्थेत आहेत आणि उरलेला सहा टक्के भाग हा तीन बेटांमध्ये विभागला गेलाय.
न्यूझीलंडसह या खंडावर न्यू कॅलेडोनिया, लॉर्ड होव्ह आयलंड आणि बॉल्स पिरॅमिड अशी तीन बेटं आहेत.
न्यूझीलंड क्राउन रिसर्च इन्स्टिट्यूट जीएनएस सायन्स'मधील भूगर्भशास्त्रज्ञ अँडी ट्यूलॉच म्हणतात की, "झिलँडिया मुळात प्राचीन गोंडवाना या महाखंडाचा भाग होता.
सुमारे 55कोटी वर्षांपूर्वी हा महाखंड तयार झाला होता आणि दक्षिण गोलार्धातील जवळपास सर्व जमीन त्यात सामावली होती.
पूर्वेकडील कोपऱ्यात हा महाखंड होता, आणि त्याला लागून इतर बरेच प्रदेश होते- त्यामध्ये पश्चिम अंटार्क्टिकाचा अर्धा भाग होता आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण पूर्वेकडील भाग होता.
मग सुमारे 10 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी 'आपल्याला अजून पूर्णतः माहित नसलेल्या एका प्रक्रियेमुळे झिलँडिया दूर खेचला गेला."
हा खंड 49 लाख चौरस किलोमीटर इतका विशाल असून, त्याचं आकारमान मादागास्करच्या सुमारे सहा पट असल्याचं सांगितलं जातं. हा भूभाग जगातील सर्वांत लहान, सर्वांत निमुळता व सर्वांत तरुण खंड म्हणून ओळखला जातो.
झिलँडियाचा शोध कसा लागला?
भूगर्भशास्त्रज्ञ निक मॉर्टिमर म्हणतात की उंचवटा असलेला, विविध प्रकारचे खडक असलेला व जाड कठीण कवच असलेला भूभाग खंड म्हणून ओळखला जातो.
1960 च्या दशकात भूगर्भशास्त्रज्ञांनी खंडाची अशी व्याख्या केली होती. याशिवाय हा भूभाग विशाल असणं गरजेचं होतं त्यामुळे जमिनीच्या कोणत्याही तुकड्याला खंड म्हणता येत नाही.
स्कॉटिश नेचर एक्सपर्ट सर जेम्स हेक्टर यांनी झिलँडियाच्या अस्तित्वासंबंधीचे पहिले पुरावे गोळा केले होते.
1895 साली न्यूझीलंडच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या बेटांचं सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या सफरीमध्ये त्यांचा सहभाग होता. या बेटांचा भूगर्भीय अभ्यास केल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की, न्यूझीलंड म्हणजे 'एका पर्वतरांगेचा अवशेष आहे. ही खंडप्राय पर्वतरांग दक्षिणेपासून पूर्वेकडे पसरली असून, त्याचं हे शिखर आहे. आता ही रांग पाण्याखाली गेलेली आहे...'
1960 पर्यंत झिलँडियाबद्दल माणसाला एवढीच माहिती होती. . नंतर, 1995 साली अमेरिकी भूभौतिकशास्त्रज्ञ ब्रुस लुयेन्डिक यांनी पुन्हा एकदा या प्रदेशाचं वर्णन खंड असं केलं आणि त्याला झिलँडिया असं म्हणण्याचं सुचवलं.
नंतर युनायटेड नेशन्स लॉ ऑफ सी कन्व्हेन्शन अस्तित्वात आलं आणि त्यामध्ये कोणत्याही देशाला त्यांचा कायदेशीर प्रदेश त्यांच्या अधिकृत आर्थिक क्षेत्रा'पलीकडे विस्तारता येईल, त्यांच्या किनाऱ्यापासून 370 किलोमीटर दूरपर्यंतच्या समुद्री प्रदेशावर त्यांना 'विस्तारित खंडीय मंच' म्हणून दावा करता येईल आणि या प्रदेशातील खनिजांचे साठे व तेलही त्यांच्या हक्काचं राहील' असा नियम बनवला गेला.
न्यझीलंडने स्वतःचं एका मोठ्या खंडाचा भाग असणं सिद्ध केलं, तर या देशाचा प्रदेश सहा पटींनी वाढणार होता आणि म्हणून झिलँडियाच्या रिसर्चमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आली आणि हळू हळू झिलँडियाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडू लागले.
झिलँडियाचा नकाशा कसा तयार केला गेलाय?
समुद्राच्या तळापासून गोळा केलेल्या खडक आणि गाळाच्या नमुन्यांचा अभ्यास करून संशोधकांनी हा नवीन नकाशा तयार केलाय.
हा नकाशा तयार करत असताना या भागातील seismic data चा अभ्यास करण्यात आला आणि यातूनच सुमारे पन्नास लाख चौरस मीटर एवढा मोठा आकार असणाऱ्या या खंडाचं व्यवस्थित मॅपिंग करण्यात आलं.
न्यूझीलंडच्या पश्चिम किनारपट्टीवरील कॅम्पबेल पठारजवळ एक Subduction Zone असल्याचं या अभ्यासात सांगणात आलंय. Subduction Zoneम्हणजे असा प्रदेश जिथे पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्स दरवर्षी काही सेंटीमीटर अंतराने पृथ्वीच्या आवरणात परत जात असतात.
आता झिलँडियाचा नकाशा प्रकाशित केला गेल्याने जगातल्या आठव्या खंडाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीय.