गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By Author रूपाली बर्वे|
Last Updated : बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (17:48 IST)

हा संसर्ग समाजाला पोखरून टाकेल!

तिने शेवटचा सुसाइड नोट सोडला... कोणाविषयीही तक्रार नाही... माझ्या मृत्यूला कोणालाही जवाबदार धरु नये... तिने त्रासून मेसेज टाइप केला मी सर्व प्रयत्न केले, पण आता माघार घेते... 

मनस्थितीचा विचार करावा तर नेमकं जीव घेण्याइतकी परिस्थिती का निर्माण झाली असावी.. त्रास इतका शिगेला का पोहोचला असावा... की थेट 'नाळ'शी जुळलेलं नातं गळा आवळून संपवास वाटावं..... पाठोपाठ निर्घृण हत्या केल्याच्या या धक्कादायक घटना समोर आल्यावर त्या नाशिकच्या असो वा ठाणे येथील किंवा देशातील कुठल्याही भागाचा का नसो.... प्रश्न उद्वभतो की पालकांच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत की मुलं कुठे कमी पडत आहेत... दुसर्‍यांना पछाडत उंची गाठण्याच्या नादात आपण किततरी खोलात पडत चालले आहोत...याचं भान येईपर्यंत सगळं संपलेलं असायचं...

राग, द्वेष, अपेक्षाचं ओझं इतंक... की आईने रागाच्या भरात साडेतीन वर्षाचा खेळत्या वयातील मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नाही म्हणून संतापून उशीने त्याच तोंड दाबून श्वास कायमचा थांबवावा.... नंतर अपराधी भावनेमुळे स्वत: गळफास घेऊन आत्महत्या करावी.... फक्त कोणाविषयीही तक्रार नाही म्हणून काही क्षणात हसता-खेळता संसार उद्वस्त करावा.

तर मुलीने डॉक्टर व्हावं या अपेक्षांच्या मोहापाई आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने १५ वर्षीय मुलीने कराटे बेल्टने आईचा गळा आवळून नेहमीसाठी त्रास नाहीसा करण्याचं ठरवावं...

मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवणारे हे दोनच प्रकरण नव्हे तर असे किती तरी मुलं असतील जे अशामुळे नैराश्याच्या गर्तेत जात आहे... केवळ त्यांची नोंद नाही....

आताच्या काळ-परिस्थितीमुळे लोकांची मानसिक स्थिती सामान्य नसल्याचं समजलं जातंय परंतु लोक आतून इतपत तुटुन राहीले की सर्व बरबाद करायला निघाले आहे हे धक्कादायकच नव्हे तर त्याहून कितीतरीपट वेदनादायक आहे.... कोरोनाच्या काळात दार-खिडक्या कोंडून मुलं काय मोठे देखील घराच्या चार भिंतीच्या आत एखाद्या स्क्रीनवर डोळे गढवून बसलेले आहेत. अभ्यास म्हणजे नेमकं काय हे तर सोडाचं... ज्याने बहुतेक शाळेचं तोंड देखील बघितलं नसेल... त्यावर इतका ताण की त्याने शिस्तीने ऑनलाइन अभ्यास करावा... असा चिमुकला नकळत आईच्या रागाचा शिकार व्हावा. एक मुलगी जी इतर मुलांप्रमाणे मागील दीड वर्षापासून नवीन पद्धतीने अभ्यास करत स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात असेल तिला नीट परीक्षेसाठी तयारी करावी अशी मागे लागणारी आई एखाद्या प्राणघातक शत्रूपेक्षा कमी दिसत नसावी... ज्यामुळे तिला इतकं मोठं पाऊल उचलावंस वाटलं...

समाजात अशा घटना संसर्गाप्रमाणे आहेत, यावर उपचार केला नाही तर त्या घरोघरी पोहचायला उशीर लागणार नाही. ज्याप्रकारे साथीच्या आजाराला झुंज देण्यासाठी काटेकोर नियम पाळले जावे तसेच काही नियम पालकांनी देखील आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करावा. यात चुक कोणाची या प्रश्नाचं उत्तर शोधणे सोपे नाही... पण कदाचित आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचं ओझं चिमुकल्यांच्या डोळ्यात बसवून खर उतरवणं योग्य आहे का? त्यांच्यासाठी ते झेलणे सोपे आहे का... त्यांनी का म्हणून ते झेलावं... तुम्ही बघितलेली स्वप्ने त्यांनी का पूर्ण करावी.. त्यांची स्वत:ची स्वप्न का नसावी.. याचा मात्र एकदा तरी विचार करण्याची गरज नाहीये का ???

त्यांना उंच भरारी घेण्यासाठी आपल्या आधाराची गरज नक्कीच असेल... हवं तर पालक म्हणून कर्तव्य म्हणा आणि पाळा देखील... पण झेप घेताना प्रेम, आशीर्वाद, पाठिंबा असू द्या... त्यांना त्याचं आकाश स्वत: शोधू द्या... उड्डाणाची किंमत कळू द्या... स्वत:च्या स्वप्नांकडे वळू द्या... कुठास ठाऊक त्या यशात त्याच्या चेहर्‍यावरील हसू अधिक आनंदी करुन जाईल... 

अंधार... नैराश्य... खंत... ओझं... सर्व काही जीवनापेक्षा नक्कीच मोठं नाही... कारण यशस्वी होण्यासाठी बरेच मार्ग असू शकतात... पाऊलवाट मात्र चुकीची नसावी...