गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (11:42 IST)

निरोप श्रावणाला...

गेले आठ-दहा दिवस बाहेर धुवांधार बरसत राहिलेला पाऊस. अचाट नि अफाटच रूप तचं!
जिकडे तिकडे चोहीकडे ! पूरच पूर चोहीकडे! असे झाले ना! श्रावणातल्या या सरींनी सुरूवातीचे पंधरा दिवस सोनसरी घालून झाडापेडांना मोकळेपणाने मिरवू दिलं. कोवळ उन्हांनी न्हाऊ माखू घातलं. पाखरांशी बोलत मस्त रेंगाळलाही हा श्रावण. एका जागी राहाणं, थांबणं किंवा तुंबून राहणं हे जीवन नव्हेच! सतत पुढची वाट शोधत राहाणे हाच ‘जीवनधर्म'! नाही का? श्रावण पंधरवड्यातच असाच काहीसा झाला. पाण्याच्या कावडी घेऊन पुढील प्रवासाला निघाला. गारठा शिंपडत चालला..
 
वाढलेल्या गारठ्यात खायला किंवा प्यायला काहीतरी गरमागरम असावं; असं का वाटतं बरं? पाहा ना! रिची ही उष्णता निर्माण करणारी गोष्ट पावसाळ्यात का बरे जास्त खावीशी वाटते?
बाहेर गारठावाढला की पोटात आग का बरे पेटते? पोटाची आग बाहेरच्या ओल्या गारठ्याने विझू विझू का बरे होत नाही..? याउलट ती धगधग धगते कशी बरे? ती भडक भडक भडकते कशी बरे? पाण्याने पोटातली आग भडकते आणि विझतेही अशी दुहेरी लीला करावी, तर ती त्या परेश्वरानेच..!
 
पाणी आणि आगीचं वैर असतं असं मला कधीच जाणवलं नाही. खरं तर ही दोन्ही रूपे वरून भिन्न दिसत असली तरी एकच आहेत; असंच मला वाटतं. तेज आणि जल या दोन्ही जुळ्यांना मला एकच नाव द्यावे वाटते. ‘तेजल'! हो. तेजल या नावाने बारसे करावे वाटते.
 
सृष्टीच्या चलनवलनासाठी आग आणि पाणी, आपापली भूमिका बदलतात. पाण्याचा एकेक थेंबात प्रचंड स्फोटक हायड्रोजनचे दोन अणू आणि स्फोटाला मदत करणार्याण ऑक्सिजनचा एक अणू याचे व्यामिश्र रूप आहेच ना? ही दोन्ही रूपे एकत्र समानतेने जेव्हा येतात तेव्हा विशुद्ध जीवनाचे स्वरूप जन्मा येते.
 
वाट चालताना पाय मळतच असतात. अनीतीने फुकटचे खाऊ गेलो तर घाम फुटतो. कष्टात जगताना असे होत नाही.. कष्टात घाम येतो.. घामाला चव आहे. देहाकडून विदेही वाटचाल करताना तिखटाठिालाही सोडून द्यावं लागतं.
 
कधी कधी प्रश्नपडतो की मीठ आणि मिरची या दोन गोष्टी नसत्या तर माणसाचे जीवन रसाळ झाले असते का? एक वेळ ‘गोडी' ही चव नसली तरी चालते; परंतु मीठ आणि तिखट हवेच..! तिखटमिठाशिवाय जीवनाची रंगतसंगत नाही. तिखटमिठाशिवाय जीवन बेचव होऊन जाईल. जीवनाचा पैलतीर मात्र विशुद्ध असायला हवा. घनातल्या जलधारांसारखा!
 
एकदा तुफान टप्पोरी बोरांसारखा जोरदार पाऊस पडत होता. वाटले की याला जरा पकडावं. बांधावं. धरून ठेवावं. मग, पावसाचे पाणी गोळा करण्याकरता अंगणामध्ये एक घमेले ठेवले. घमेल्यामध्ये साचलेला टपोर पाऊस तांब्यामध्ये भरून घेतला. दोन तासांमध्ये कसेबसे दोन चार तांबे गोळा झाले होते. पाऊस पकडून ठेवणं किती अवघड का! डोळ्यासमोर बरसत असला तरी हवा तेव्हा, हवा तितका धरून ठेवता येत नाही, त्याला पाऊस म्हणावं..! नाही का?
 
अहाहा! किती स्वच्छ पाणी. किती नितळ! पावसाच्या पाण्यामध्ये कोणते क्षार नसतात. त्याला  चव नसते.. ते पाणी गोडही नव्हते की, खारटही नव्हते. नेहमी पितो त्या पाण्याला काहीतरी चव असते, चवहीन पाणी आपण पीत नाही..
 
क्षार नीर चवदार करतात, तर नीर क्षीरासही आकार देते, प्रवाही करते. यापलीकडे गेल्याशिवाय  मात्र जीवनाचे विशुद्ध स्वरूप दिसत नाही. सृष्टीतला मूल जीवनधर्म, रसहीन, गंधहीन आणि चवहीन अशा विशुद्ध स्वरूपाचाच आढळतो. कृष्णगीतेतला आत्मा असाच असतो का?
 
समुद्राचे मीठ पावसाच्या पाण्यात येत नाही; मग सुद्रातले मीठ म्हणजे नेमकं काय? कोठून बनतं ते? सागराच्या पोटात मिठाचा कारखाना असतो का? अवघ्या सृष्टीच्या जीवनयज्ञातल्या कष्टाचा घाम पोटात घेऊन रत्ने जो बनवतो, तो सागर होतो. सृष्टी कष्टात सुंदर दिसते. कष्ट घामात सुंदर दिसते. घामाचे जीवन रत्नाकर होते. पुन्हा तप तप तपून निर्मल होते.
 
जीवनाचे अंतिम स्वरूप असं पावसाच्या पाण्यासारखं चवहीन, रसहीन, गंधहीन आहे. म्हणून ते निर्मल आहे. विशुद्ध आहे. निर्मलाची रूपे अविनाशी असतात. बाहेरचा पाऊस अजूनही धुवांधार. रस्तंना पूर आलेला. डोळ्यात श्रावणाचा निरोप दाटलेला...!
- दीपक कलढोणे