शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

आजी-आजोबांच्या अतिलाडाने मुले लठ्ठ

चीनमध्ये जल वितरणाचे काम करणार्‍या झांग फेंग यांना सध्या आपल्या 8 वर्षीय मुलाच्या वाढत्या वजनाची चिंता सतावू लागली आहे. फेंग यांनी त्यास काही दिवस आई-वडिलांकडे ठेवले होते व ते बीजिंगमध्ये नोकरी करत होते. कारण त्यांना गावात काम मिळत नव्हते.
 
झांग यांचे मूळ गाव शेनडाँग प्रांतात आहे. आजी-आजोबा त्याची खूप काळजी घेतील म्हणून त्यांना गावाकडे ठेवले होते. त्यानुसार आजी-आजोबांनी मुलाचे खूप लाड केले. जंकफूडही त्यांनी दिले. 1980 मध्ये जन्मलेल्या माझ्यासारख्या लोकांना आपल्या मुलांच्या संगोपनात कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. नोकरीमुळे मुलांना जास्त वेळ देत येत नाही. झांग यांच्या अडचणींना नवीन संशोधनाच्या निष्कर्षातून बळ मिळाले आहे. आजी-आजोबा ज्या मुलांचे संगोपन करतात. त्या मुलांमध्ये किशोरावस्थेत लठ्ठपणा येण्याची शक्यता अधिक असते, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ब्रिटनच्या बर्मिगहॅम विद्यापीठाने हा दावा केला आहे. ग्वाँगझोऊ आणि ग्वाँगडोंग या चीनमधील दोन मोठ्या शहरांत हा अभ्यास करण्यात आला. मुलांमधील वाढत्या स्थूलपणामागील एक कारण आजी-आजोबा ठरले आहेत. हा निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेव्हियरल न्यूट्रिशन अँड फिजिकल अँक्टिव्हिटीमध्ये प्रकाशित झाला आहे.
 
केवळ माहितीचा अभाव असल्याने आजी-आजोबा मुलांना मनाला वाटेल ती गोष्ट आणून देत असतात. महत्त्वाचे म्हणजे कृश मुलांच्या तुलनेने स्थूल मुले कमी तंदुरुस्त असतात, असे समजून ते मुलांना अधिक खाऊ घालतात. आपण अभावग्रस्त आयुष्य काढले आहे. त्यामुळे मुलांचे सर्व लाड पुरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुसरीकडे गेल्या दशकभरात चिनी लोकांची उंची आणि लठ्ठपणा वाढल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आयोगाच्या पोषण आहार अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
 
चीनमध्ये सुमारे 10 टक्के मुले आणि किशोरवयीनांचे वजन सरासरीपेक्षा खूप अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक गंभीर आजाराची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. वास्तविक 2002 मध्ये हा आकडा 5.1 टक्के होता. चीनच्या अनेक प्रदेशांतील मुलांमध्ये ही समस्या वाढू लागली आहे, असे अनेक बालरोग तज्ज्ञांनी म्हटले आहे.