4 दिवसांचा आठवडा, 3 दिवस सुटीच्या प्रयोगाचा आईसलंडमध्ये दिसला 'हा' परिणाम
आठवड्यातले 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी या आईसलंड सरकारने केलेल्या प्रयोगाला प्रचंड यश मिळालं असून अनेकांनी या पर्यायाला पसंती दिली आहे.
2015 ते 2019 या काळात करण्यात आलेल्या या प्रयोगादरम्यान कर्मचाऱ्यांना कमी तास काम करण्यासाठी तितकाच पगार देण्यात आला.
या काळात बहुतेक कामांच्या जागी कामाचा दर्जा तोच राहिला वा सुधारल्याचं संशोधकांनी म्हटलंय.
याच धर्तीवरचे प्रयोग स्पेनमध्ये करण्यात येतायत. न्यूझीलंडमध्ये युनिलिव्हर कंपनीही हा प्रयोग करतेय.
आईसलंडमध्ये रेयकजविक शहर कौन्सिल आणि आईसलंड सरकारने केलेल्या या चाचणीमध्ये 2,500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. हे प्रमाण आईसलंडमधल्या काम करणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1 टक्का आहे.
अनेक कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आठवड्याला 40 वरून 35 किंवा 36 वर आल्याचं युके थिंक टँक ऑटोनॉमी आणि आईसलंडच्या असोसिएशन फॉर सस्टेनेबल डेमॉक्रसीने म्हटलंय.
या चाचण्या सुरु झाल्यानंतर कर्मचारी संघटनांनी कामाच्या पद्धतीविषयीची बोलणी केली आणि त्यानंतर आता आईसलंडच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 86 टक्के जणांनी त्याच पगारात कमी तास काम करण्याचा पर्याय स्वीकारला असून किंवा लवकरच हा अधिकार त्यांना मिळणार असल्याचं संशोधक सांगतात.
या प्रकारे काम केल्याने काम करताना ताण कमी येतो किंवा अति कामामुळे शरीरावर परिणाम होण्याची शक्यता कमी असते. यामुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि काम - खाजगी आयुष्य यातला संतुलन सुधारल्याचं या प्रयोगादरम्यान आढळलंय.
थिंक टँक ऑटोनॉमीचे संचालक विल स्ट्राँग यांनी म्हटलं, "सार्वजनिक क्षेत्रातला कामाचा आठवडा लहान करण्याचा हा प्रयोग सगळ्या अर्थांनी भरपूर यशस्वी झाला, असं म्हणता येईल. अशाप्रकारच्या लहान आठवड्यांचा प्रयोग सार्वजनिक क्षेत्रात राबवणं शक्य असल्याचं यावरुन दिसतं आणि तर देशांची सरकारं यापासून प्रेरणा घेऊ शकतात."
अल्डा संस्थेतले संशोधक गुडमुंडर हॅराल्डसन सांगतात, "आधुनिक काळामध्ये कमी तास काम करणं शक्य आहे आणि हा एका चांगला बदल असल्याचं आईसलंडमधल्या या कमी कामाच्या तासांच्या प्रयोगातून लक्षात येतं."
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे स्पेनमधल्या कंपन्यांमध्ये 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्याचा प्रयोग केला जातोय.
अशीच चाचणी युनिलीव्हर कंपनी न्यूझीलंडमध्ये घेतेय. पगाराला धक्का न लावता कामाचे तास 20 टक्क्यांनी कमी करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिला जातोय.
आठवड्यातले कामाचे दिवस 5 ऐवजी 4 केले तर त्यामुळे युकेची कार्बन फुटप्रिंट म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी व्हायला मदत होणार असल्याचं मे महिन्यातल्या युकेतल्या पाहणीत आढळलं होतं.