शुक्रवार, 9 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (08:56 IST)

'कुष्ठरोगाचे जीवाणू नवे अवयव तयार करू शकतात'

- जेम्स गॅलाघर
आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
 
कुष्ठरोगाचे जीवाणू अवयवांची पुन्हा निर्मिती करू शकतात किंवा अवयव पुन्हा आहे तसे होण्यासाठी मदत करू शकतात, असं एडिंबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं आहे. 
 
योग्य आरोग्यदायी वाढ झाल्यास हे जीवाणू यकृताचा आकार दुपटीने वाढवू शकतात, असं या जीवाणूंच्या मदतीने प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात दिसून आलं आहे. यासाठी कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा स्वार्थी आणि चोरटा स्वभाव कारणीभूत आहे.
 
त्यामुळे अधिकाधिक उती म्हणजे टिश्यूंमध्ये संसर्ग पसरत जातो. ही कृती ते कशी करतात हे शोधून काढलं तर या काळातील एक महत्त्वाची उपचारपद्धती विकसित होईल, असं शास्त्रज्ञांना वाटतंय. 
 
जैविक किमया
कुष्ठरोगाचा माणसाच्या नसा, त्वचा आणि डोळ्यांना संसर्ग झाल्यास अपंगत्व येते. आजवरचा इतिहास पाहाता कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा संसर्ग झालेल्या लोकांना इतरांनी नेहमीच आपल्यापासून लांब टाकलेलं दिसून येतं. 
 
मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूंमुळे हा रोग होतो. परंतु या जीवाणूंमध्ये एकाप्रकारच्या उतीचे दुसऱ्या प्रकारात रुपांतर करण्यासारखी काही जैविक किमया घडवून आणण्याचीही क्षमता आहे, त्यामुळे शास्त्रज्ञ या अभ्यासाकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळेच कुष्ठरोग होणाऱ्या दुसऱ्या प्राण्याचा म्हणजे आर्माडिलोचा शास्त्रज्ञांनी अभ्यास सुरू केला.
 
आर्माडिलो हा जाड खवले असलेला प्राणी असतो. आर्माडिलोवर अमेरिकेत झालेल्या प्रयोगात त्याच्या यकृतात जीवाणूंचा संसर्ग झाला होता.
 
तिथं त्या जीवाणूंनी स्वतःच्या वाढीसाठी संपुर्ण युकृताचा ताबा स्वतःच्या वाढीसाठी घेतला होता.
 
त्याबद्दल अधिक सांगताना एडिंबर्ग विद्यापीठातील सेंटर फॉर रिजनरेटिव्ह मेडिसिनचे प्राध्यापक अनुरा रामबुक्कना म्हणाले, हे अगदीच अनपेक्षित होतं. सेल रिपोर्ट्स मेडिसिनच्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या निबंधानुसार यकृताचा आकार जवळपास दुपटीने वाढला होता. 
 
कदाचित ही वाढ दोषपूर्ण किंवा कर्करोगासारखी वाटू शकते, पण त्याच्या सखोल अभ्यासानंतर ती वाढ पूर्णतःनिरोगी आणि योग्य आरोग्यदायी होती असं दिसलं त्यात रक्तवाहिन्यांचं जाळं आणि पित्ताशयाची नलिकाही होती. हे एकदम चक्रावून टाकणारं आहे, असं प्रा. अनुरा यांना वाटतं.
 
हा चमत्कार कुष्ठरोगाचे जीवाणू कसे काय करू शकतात? कोणतीही पेशींची उपचार पद्धती अशी गोष्ट करू शकत नाही. 
 
वेगवान वाढ
 हे जीवाणू जणू यकृत वाढीच्या घड्याळाची किल्लीच फिरवतात असं दिसून येतं. आपल्या शरीरातील अनेक क्रिया करण्यासाठी लागणाऱ्या चयापचयात पूर्ण वाढ झालेल्या यकृतातील पेशींचा मोठा वाटा असतो. परंतु हे कुष्ठजीवाणू त्यांना थोड्या मागच्या अवस्थेत नेतात.
 
पूर्णवाढीच्या आधीची म्हणजे त्यांच्या पौगंडावस्थेत नेतात त्यामुळे त्यांची संख्या वेगाने वाढते. 
 
या प्रयोगातच या पेशींच्या डीएनएचा अभ्यास करण्यात आला, तेव्हा या पेशी पौगंडावस्थेत गेल्याचं नाही तर यकृताची निर्मिती होताना असतील अशा अगदी भ्रूणावस्थेत असल्याचं दिसून आलं. 
 
नैसर्गिक प्रक्रिया 
परंतु हे सगळं कसं घडतं याचा तपशील अजूनही नीट उलगडलेला नाही. हे कदाचित पेशींचं घड्याळ उलट्या दिशेने पेशी इतर कोणत्याही पेशींप्रमाणे होतील अशा बिंदूपर्यंत फिरवल्यासारखं आहे, अर्थात त्यामुळे त्या कर्करोगासारख्या होण्याचा धोका आहे, असं नोबेल पारितोषिक मिळवणारं संशोधन सांगतं.
 
 प्रा. अनुरा यांच्यामते लेप्रसीचे म्हणजे कुष्ठरोगाचे जीवाणू पर्यायी मार्ग वापरतात. हा एक सुरक्षित मार्ग असून त्यासाठी कुष्ठजीवाणूंना फार वेळ लागतो, त्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, असं त्या सांगतात. 
 
आश्वासक निकाल
जे लोक यकृताच्या प्रत्यारोपणाची वाट पाहात आहेत किंवा ज्यांच्या शरीरात इतरत्र कोठेही क्षती झालेली असेल अशा लोकांच्या यकृताच्या दुरुस्तीसाठी आणि इतर मदतीसाठी याचा वापर करता येईल, अशी आशा यात दिसत आहे. 
 
जीवाणूंचा वापर नवी औषधं आणि अवयवांची दुरुस्ती निर्मिती करण्यासाठी रणनीती वापरणं हे एक स्वप्न आहे, असं प्रा. अनुरा सांगतात. अर्थात यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. 
 
रिडिंग विद्यापीठातील डॉ. दारियस वायडेरा सांगतात, “यातून यकृताशी सिर्होसिस सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.  हा प्रयोग आर्माडिलोवर झाला आहे. तो मानवी यकृतात कसा होईल यावर अद्याप स्पष्टता नाही. यात वापरलेले जीवाणू हे एका रोगाचे जीवाणू आहेत त्यामुळे ते मानवी प्रयोगात वापरण्याआधी प्रयोगशाळेतील चाचणी होणं आवश्यक आहे.”