शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (15:21 IST)

प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे काय? ती होण्याची कारणं काय असतात?

मुदतीपूर्वी (प्रीमॅच्युअर) जन्माला आल्याने उद्भवणारी शारीरिक गुंतागुंत ही 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमधील मृत्यूचं प्रमुख कारण आहे.2020 मध्ये 1.3 कोटी अधिक किंवा 10 पैकी 1 पेक्षा जास्त बाळं मुदतपूर्वी जन्माला आली.
 
‘जागतिक आरोग्य संघटना’ (डब्लूएचओ) म्हणते की 2019 मध्ये जगभरातील प्रत्येक देशात 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सुमारे 900,000 बाळांचा मुदतीपूर्व जन्माच्या वेळी झालेल्या गुंतागुंतीने मृत्यू झाला.
 
मुदतीपूर्वी जन्मणारं (प्रीमॅच्युअर) बाळ म्हणजे काय?
गर्भधारणेचे 37 आठवडे पूर्ण होण्यापूर्वी बाळ जिवंतपणे जन्माला आल्यास त्याची व्याख्या मुदतपूर्व (प्रीमॅच्युअर) बाळ अशी केली जाते.
 
एक्स्ट्रीमली प्रीटर्म (28 आठवड्यांपेक्षा कमी)
व्हेरी प्रीटर्म (28 ते 32 आठवड्यांपेक्षा कमी)
लेट प्रीटर्म (32 ते 37 आठवडे)
 
गरोदरपणात बाळ जितक्या लवकर जन्माला येतं तितकी बाळाची प्रकृती चिंताजनक आणि बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्याची जास्त गरज भासते. मुदतपूर्व जन्म ही जागतिक समस्या आहे. दरवर्षी लाखो बाळं मुदतीपूर्वी जन्माला येतात.
 
मुदतपूर्व (प्रीमॅच्युअर) जन्माची कारणं?
इंग्लंडच्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (NHS) नुसार गर्भाशयाची पिशवी अचानक फुटल्याने उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे मुदतपूर्व बाळ जन्माला येणं हे सर्वात सामान्य कारण आहे.
 
इतर काही कारणं पुढीलप्रमाणे आहेत;
 
संसर्ग
 
आईची आरोग्य स्थिती - उदा. प्री-एक्लॅम्पसिया (गर्भावस्थेच्या शेवटच्या अवस्थेत होणारा आजार) यापरिस्थितीत तीव्र डोकेदुखी, दृष्टीदोष आणि उलट्या होऊ शकतात.
 
दोन मुलांमधील कमी अंतर
 
इंग्लंडमधील ‘टॉमी’ ही धर्मदाय संस्था मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांशी संबंधित संशोधन करते. त्यांच्या संशोधनात असं आढळून आलंय की, काही स्त्रियांमध्ये गर्भधारणेदरम्यान गर्भाशय ग्रीवा (योनी आणि गर्भाशयादरम्यानचा कालवा) खूप लवकर उघडतो. त्याचा लवकर विस्तार होणं मुदतपूर्व बाळ जन्माला येण्यास कारणीभूत ठरतं.
 
टॉमीज प्रीटर्म बर्थ सर्व्हिलन्स क्लिनिक चालवणारे ऑब्स्टेट्रिक्सचे प्रोफेसर अँड्र्यू शेन्ना यांच्या म्हणण्यानुसार, मुदतपूर्व जन्म रोखण्यासाठी खूप खर्चिक अशा थेरपी आणि उपचार आहेत. उदा. गर्भाशय ग्रीवाची शिलाई किंवा सर्क्लेज.
 
गर्भाशय ग्रीवाच्या ऑपरेशनमध्ये गर्भाशयाच्या मुखाभोवती टाके घातले जातात.
 
लवकर प्रसूतीचे संकेत
प्रोफेसर शेन्ना म्हणतात की, प्रारंभिक गोष्टींवरून प्रसूतीचे संकेत मिळू शकतात. सामान्य गर्भधारणेच्या वेळी होणार्‍या प्रसूती वेदनांप्रमाणेच त्या असू शकतात. गरोदरपणाच्या काळात योनीमार्गातून होणारा स्राव ही सामान्य गोष्ट आहे. पण स्पष्ट डिस्चार्ज येत असेल तर हा सर्विकल म्युकस असू शकतो. स्राव मोठ्या प्रमाणात झाला तर तो पाण्याची पिशवी फाटण्याचा संकेत असू शकतो.
 
"बहुतेकवेळा ही केंद्रं रुग्णांना होणाऱ्या त्रासावर उपचार करणारी असतात. एखाद्या स्त्रीला प्रसववेदना आल्या तर तिला लवकरात लवकर चांगल्या ठिकाणी नेणं अत्यावश्यक आहे.”
 
“बाळ लवकर जन्माला येण्यासाठी काही औषधं फायदेशीर ठरतात. बाळाच्या मेंदूचे रक्षण करण्यासाठी मॅग्नेशियम मदत करू शकतं आणि बाळाच्या फुफ्फुसांना चालना देण्यासाठी आणि श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी आईला स्टेरॉइड्स दिली जाऊ शकतात.”, असं प्रा. शेन्ना स्पष्ट करतात.
 
मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांच्या जगण्याचं प्रमाण किती आहे?
मुदतीपूर्वी (प्रीमॅच्युअर) जन्म ही जागतिक समस्या आहे, परंतु बहुतेक प्रकरणं दक्षिण आशिया आणि सब-सहारन आफ्रिकेत आढळतात, असं ‘डब्लूएचओ’ म्हणतं.
 
मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांचं जगण्याचं प्रमाण देशानुसार बदलतं. उदाहरणार्थ, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जन्मलेल्या ‘एक्स्ट्रीमली प्रीटर्म’ बाळांपैकी 90% पेक्षा जास्त (28 आठवड्यांपूर्वी) जन्माच्या पहिल्या काही दिवसांतच मरण पावतात. परंतु उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ‘एक्स्ट्रीमली प्रीटर्म’ बाळांचा मृत्यू होण्याचं प्रमाण 10% पेक्षा कमी आहे.
 
तरीही, सगळीकडेच जिवंत राहिलेल्या अनेकांना आयुष्यभर अपंगत्वाचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये, दृष्टीदोष, श्रवणदोष, गतिमंदपणा, इ. समस्यांचा समावेश होतो. कारण त्यांच्या शरीराचा गर्भात पूर्ण विकास झालेला नसतो.
 
मुदतीपूर्वी जन्माला आलेल्या बाळांना, विशेषत: खूप लवकर जन्माला आलेल्या आणि सर्वात कमी वजनाच्या 1 किलो ते 1.3 किलो (2 ते 3 एलबी) पेक्षा कमी - आरोग्यविषयक गुंतागुंत आणि अपंगत्वाचा धोका जास्त असतो.
 
मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्याल?
गर्भधारणेच्या 24 आठवड्यांच्या आसपास बाळ जन्माला आल्यास ते जिवंत राहू शकतं, परंतु त्या बाळावर नवजात बाळांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) उपचार करण्याची गरज असते.
 
जगण्यासाठी त्यांना पुढील उपकरणांची आवश्यकता असते:
 
इनक्यूबेटर - नवजात बाळांच्या युनिटमध्ये सर्वात सामान्यपणे वापरलं जाणारं उपकरण आहे.गर्भाशयासारखं वातावरण निर्माण करण्यासाठी आणि मुदतपूर्व जन्मलेल्या नवजात बाळांना विकसित होण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी डिझाइन केलंय.
व्हेंटिलेटर - ऑक्सिजनचा स्थिर प्रवाह सुरू ठेवणे आणि स्वत:हून श्वासोच्छवास करण्यासाठी सक्षम नाहीत अशा नवजात बाळांना श्वसनक्रियेत मदत करण्यासाठी याचा वापर केला जातो.
मॉनिटर्स - हृदयाची गती, रक्तदाब आणि ऑक्सिजन पातळी यांसारख्या महत्त्वाच्या लक्षणांचा मागोवा घेण्यासाठी वापरलं जातं.
इंट्राव्हेनस ड्रीप्स - ज्याचा उपयोग रक्तवाहिन्यांद्वारे बाळांना द्रव पदार्थ देण्यासाठी किंवा औषधोपचार करण्यासाठी केला जातो.
फीडिंग ट्यूब - नाकातून किंवा तोंडातून बाळाच्या पोटात अन्न पोहोचवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
इन्फ्यूजन पंप - पोषण, द्रव किंवा रक्त उत्पादनं आणि औषधं देण्यासाठी वापरले जातात.
नाभीसंबधीचा कॅथेटर - बाळाला औषध किंवा पोषण देण्यासाठी याचा उपयोग करतात. रक्तदाब मोजण्यासाठी आणि रक्तातील विशिष्ट वायूंची पातळी तपासण्यासाठीही हा प्रकार वापरला जातो.
स्कीन-टू स्कीन कॉन्टॅक्ट
गेल्या वर्षी ‘डब्लूएचओ’ने नवीन मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली, ज्यामध्ये असं म्हटलंय की स्किन-टू-स्किन कॉन्टॅक्ट (त्वचेचा त्वचेशी संपर्क) ज्याला ‘कांगारू पॅरेंट केअर म्हणून ओळखलं जातं, ते सुरूवातीच्या काळात बाळाला इनक्यूबेटरमध्ये न ठेवता जन्मानंतर लगेच सुरू केलं पाहिजे.
 
नियमित असं केल्याने पालक आणि बाळ दोघांनाही आराम मिळतो. बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाचे नियमन देखील यामुळे होतं, तसंच गर्भाच्या बाहेरील वातावरणाशी शारीरिकदृष्ट्या अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यास बाळांना मदत करतं.
 
पचन आणि स्तनपानासाठी देखील हे उपयुक्त असून शरीराचं तापमान नियंत्रित करतं.
 
‘डब्ल्यूएचओ’ने केलेल्या अभ्यासानंतर आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर जास्तीत जास्त पालकांनी जन्मानंतर ताबडतोब ‘स्किन-टू-स्किन कॉन्टॅक्ट’ पद्धतीचा अवलंब केला तर दरवर्षी 150,000 लोकांचे जीव वाचू शकतात.
 















Published By- Priya Dixit