शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (16:12 IST)

कोरोनाच्या Omnicron आणि Delta व्हेरियंटमध्ये काय फरक आहे?

मयांक भागवत
कोरोनाव्हायरसचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे कोव्हिड रुग्णसंख्या वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलीय. यामुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जगभरात आतापर्यंत डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव जास्त दिसून येतोय.
 
पण, ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असल्याची भीती व्यक्त केली जातेय. ओमिक्रॉन डेल्टा व्हेरियंटपेक्षा किती भयंकर आहे? या दोन व्हेरियंटमध्ये नेमके काय फरक आहेत?
 
ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसचा आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा म्युटेशन झालेला विषाणू आहे. यामध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, शास्त्रज्ञांनी याचं वर्णन "भयावह" आणि आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.
 
ओमिक्रॉन आणि डेल्टा : म्युटेशन कोणात जास्त?
ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंमधील पहिला सर्वांत मोठा फरक म्हणजे यात झालेलं म्युटेशन.
 
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतात फेब्रुवारी 2021 मध्ये आढळून आलेल्या डेल्टा व्हेरियंटमध्ये स्पाईक प्रोटीनमध्ये 8 म्युटेशन आढळून आले होते. मात्र ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये डेल्टापेक्षा खूप जास्त प्रमाणात म्युटेशन झालेत.
 
दक्षिण आफ्रिकेच्या सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा सांगतात, "ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळल आहेत."
 
या दोन व्हेरियंटनधील दुसरा फरक म्हणजे शरिरातील पेशींच्या ज्या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो, याचा अभ्यास केला असता ओमिक्रॉनमध्ये 10 म्युटेशन, तर जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ 2 म्युटेशन झालेले होते.
 
संसर्गक्षमता कोणाची जास्त?
या दोन्ही व्हेरियंटमधील तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे संसर्गक्षमता किंवा लागण होण्याची शक्यता.
भारतात पसरलेल्या डेल्टा व्हेरियंटची संसर्गक्षमता खूप जास्त होती. कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टाचा झपाट्याने संसर्ग लोकांना झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण होण्याची भीती जास्त असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतंय.
 
महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे प्रमुख डॅा संजय ओक बीबीसीशी बोलताना म्हणाले, "ओमिक्रोनची संसर्गक्षमता इतर व्हेरियंटपेक्षा 500 पटींनी जास्त आहे."
 
दक्षिण अफ्रिकेमध्ये कोरोनासंसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढलीये. पण रुग्णसंख्या वाढल्याचं कारण ओमिक्रॉन आहे का इतर काही कारणं आहेत याचा अभ्यास केला जातोय.
 
कोणत्या व्हेरियंटमुळे गंभीर आजार होतो?
डेल्टा व्हेरियंट रोगप्रतिकारशक्तीला जुमानत नव्हता. ओमिक्रॉनही रोगप्रतिकारशक्तीला चकवा देईल अशी भीती व्यक्त केली जातेय.
WHO च्या माहितीनुसार, "ओमिक्रॉनमुळे इतर व्हेरियंट आणि डेल्टाच्या तुलनेत आजार गंभीर होतोय का नाही याबाबत अजून माहिती नाहीये. येत्या काही दिवसात याबाबत माहिती मिळेल."
गेल्याकाही दिवसांपासून दक्षिण अफ्रिकेतील रुग्णालयात रूग्ण दाखल होण्याची संख्या वाढलीये. पण याचं कारण ओमिक्रोन आहे का नाही हे सांगता येणार नाही, असं WHO चं म्हणणं आहे.
 
दक्षिण अफ्रिकेतील डॅा कोईट्सझी सांगतात, "ओमिक्रोनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये आत्यापर्यंत सौम्य लक्षणं आढळून आलेत."
 
Omicron आणि इतर व्हेरियंटची लक्षणं वेगळी आहेत?
कोव्हिड-19 चा नवीन व्हेरियंट 'ओमिक्रॉन' हा घातक असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध घेणारे तज्ज्ञ म्हणतात याची लक्षणं डेल्टा किंवा कोरोनाच्या इतर प्रकारापेक्षा वेगळी आहेत.
दक्षिण अफ्रिकेतील डॅा. ऐजेलीक कोईट्झी यांनी सर्वप्रथम ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध लावला. बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "या व्हेरियंटमुळे होणाऱ्या संसर्गाची लक्षणं अत्यंत सौम्य स्वरुपाची आढळून आली आहेत."
हा नवीन विषाणूचा प्रकार सर्वांत पहिल्यांदा 18 नोव्हेंबरला आढळून आला होता. त्या पुढे म्हणतात, "एक रुग्ण माझ्याकडे अत्यंत वेगळी लक्षणं घेऊन आला. त्याला खूप दमल्यासारखं वाटत होतं. ही लक्षणं जगभरात पसरलेल्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा खूप वेगळी होती. त्याचं शरीर दुखत होतं, स्नायू दुखत होते आणि थोडी डोकेदुखी होती. या रुग्णाचा घसा दुखत नव्हता फक्त खवखवत होता."
कोरोनाच्या इतर व्हेरियंटमध्ये लोकांच्या तोंडाची चव जाणे हे कोरोना संसर्गाचं लक्षण आहे. पण ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये असं काहीच दिसून आलं नाही.
दक्षिण अफ्रिकेतील इतर तज्ज्ञांनीदेखील ओमिक्रोन व्हेरियंटची लागण झाल्याची हीच लक्षणं दिसत असल्याची माहिती दिलीये.
दक्षिण अफ्रिकेतील तज्ज्ञांच्या मते ओमिक्रोनचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांना कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत.
 
तज्ज्ञांच्या मते कोरोनाची साथ पसरल्यापासून याची लक्षणं बदलली आहेत. ताप, सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी, श्वास घेण्यात अडथळा, उलटी यासोबत डायरियासारखी लक्षणंही दिसून आली आहेत.
Delta व्हेरियंटची जागा Omnicron घेईल?
पाचवी गोष्ट म्हणजे डेल्टा व्हेरियंट जगभरातल्या 163 देशांमध्ये पसरलाय, तर ओमिक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण 12 देशांमध्ये आढळून आलेत.
 
ओमिक्रॉनने अफ्रिकेत डेल्टाची जागा घेतल्याचं तज्ज्ञ सांगतात.
महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, "शक्यता आहे की हा नवा व्होरियंट डेल्टाला संपवून टाकेल. हा जास्त पसरणारा असला तरी खूप घाकत किंवा गंभीर नसेल."
ओमिक्रॉनबाबत जगभरात संशोधन सुरू आहे. त्यामुळे याबाबत माहिती येण्यास पुढील काही आठवडे लागू शकतात असं WHO चं म्हणणं आहे.
डॉ. जोशी पुढे म्हणाले, "ओमिक्रॉन डेल्टाचा प्रभाव संपवून कमी रोगकारक बनेल का? असं झालं तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. अपेक्षा करूया की डेल्टाची जागा हा नवीन व्हेरियंट घेईल जो कमी घातक आणि जीवघेणा आहे."
भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरियंट जगभरातील 90 टक्के नवीन केसेससाठी कारणीभूत आहे. भारतातही सद्यस्थितीत कोरोनाचे नवीन रुग्ण डेल्टा व्हेरियंटचे आढळून येत आहेत.
फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडीत सांगतात, "ओमिक्रॉन डेल्टाची जागा घेणं शक्य आहे. या व्हेरियंटची लक्षणं कशी दिसतात हे पाहण्यासाठी दोन आठवडे वाट पहावी लागेल."
तर काही तज्ज्ञांच्या मते ओमिक्रॉन डेल्टा व्हेरियंटची जागा घेईल का नाही हे आफ्रिकेतील परिस्थितीवरून काही दिवसांत स्पष्ट होईल. WHO ने सुद्धा ओमिक्रॉनची संसर्गक्षमता, आजाराची गंभीरता किंवा तीव्रतेने पसरण्याची शक्यता याबाबत अधिक संशोधन सुरू असल्याची माहिती दिलीये.