गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (16:47 IST)

कंबरेचा घेर तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? लठ्ठपणा असा ओळखा

लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी ही एक मोठी समस्या आहे. सर्वसाधारणपणे, आपण जेव्हा लठ्ठपणाबद्दल बोलतो, तेव्हा आपण बॉडी मास इंडेक्स (BMI)बद्दल बोलत असतो.
मात्र डॉक्टर्स म्हणतात, हे मोजमाप किंवा परिमाण भारतांच्या बाबतीत कदाचित अचूक ठरणार नाही.
असं म्हटलं जातं की जर आपण भारतीयांची शरीररचना, त्यांची जीवनशैली आणि भारतीयांच्या शरीरात जमा होणाऱ्या चरबीचं स्वरुप लक्षात घेतलं तर कंबर ते नितंबाचे गुणोत्तर (वेस्ट-हिप रेशो) हा लठ्ठपणा दर्शविण्याचा योग्य निकष आहे.
मध्यम कंबरेच्या घेराचं गुणोत्तर काय आहे? ते किती असलं पाहिजे? त्याचे काय परिणाम होतात?
 
डॉ. अश्विन करुप्पन हे चेन्नईस्थित मधुमेह आणि चयापचय तज्ज्ञ आहेत. लठ्ठपणाच्या मुद्द्याबाबत बीबीसी तमिळने डॉ. करुप्पन यांच्याशी चर्चा केली.
 
कंबर-नितंब परिघ गुणोत्तर काय असतं?
एखाद्या व्यक्तीच्या कंबरेचा परिघ किंवा घेराच्या (म्हणजेच नाभीपासून असलेला परिघ) संख्येला नितंबाच्या परिघाने (म्हणजेच जिथे अंडरवेअर परिधान केली जाते तिथला परिघ) भागल्यावर जी संख्या मिळते त्याला कंबर-नितंब परिघ गुणोत्तर म्हणतात.
कंबर आणि नितंब गुणोत्तर किती असायला हवं?
पुरुषांच्या बाबतीत हे गुणोत्तर 0.9 असलं पाहिजे. तर महिलांमध्ये हे गुणोत्तर 0.85 असलं पाहिजे.
पुरुषांमध्ये कंबरेचा घेर किंवा परिघ 40 इंचांपेक्षा जास्त असल्यास आणि महिलांमध्ये कंबरेचा घेर किंवा परिघ 35 इंचांपेक्षा जास्त असल्यास ते लठ्ठपणा दर्शवितं.
बॉडी मास इंडेक्स (BMI)आणि कंबर आणि नितंबाचं गुणोत्तर यात काय फरक असतो?
 
बॉडी मास इंडेक्समुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात चरबीचं वितरण कसं झालं आहे हे कळत नाही.
 
22 आणि 24 च्या दरम्यान बीएमआय असल्यास तो चांगला किंवा निरोगी मानला जातो. तर बीएमआय 26 च्या वर असल्यास तो लठ्ठपणा दर्शवतो, असं डॉ. अश्विन सांगतात.
 
कंबर ते नितंब गुणोत्तर का महत्त्वाचं आहे?
याबद्दल डॉ. अश्विन सांगतात की सर्वसाधारणपणे भारतीयांच्या शरीरात चरबी सर्व शरीरभर विखुरलेली नसते. तर शरीराच्या मध्यभागी आणि पोटामध्ये (जठर, आतडे) जास्त चरबी जमा झालेली असते.
 
"सर्वसाधारणपणे जर भारतीय व्यक्तीकडे पाहिलं तर त्यांचे हात आणि पाय लहान असतात. मात्र त्याचं पोट आणि शरीराच्या मधल्या भागावर खूप जास्त प्रमाणात चरबी असते. यालाच आपण पोटाचा वाढलेला घेर किंवा सुटलेलं पोट म्हणतो."
"मात्र पाश्चात्य देशांमधील लोकांच्या शरीरात चरबी सर्व शरीरभर समान प्रमाणात जमा झालेली असते," असं ते म्हणतात.
डॉ. अश्विन म्हणतात की याला 'बारीक लठ्ठ भारतीय' (Thin fat Indian) असं म्हणतात.
 
शरीराच्या या स्थितीला पोट सुटलेले लठ्ठ (abdominal obesity)म्हणतात. पोटावर चरबी जमा झाल्यामुळे तो येतो. भारतीय महिलांमध्ये सामान्यपणे अशा प्रकारचा लठ्ठपणा आढळतो, असं ते सांगतात.
 
"जर आपल्याला लठ्ठपणाचं गांभीर्य किंवा तीव्रता जाणून घ्यायची असेल, तर ती फक्त बीएमआयद्वारे निश्चित केली जाऊ शकत नाही. यासाठी कंबर ते नितंब गुणोत्तरची आवश्यकता असते," असं ते म्हणतात.
 
लठ्ठपणा बद्दल सांगताना डॉ. अश्विन पुढे म्हणतात, "अगदी ज्या लोकांचा बीएमआय चांगला असतो ते सुद्धा मध्यम स्वरुपात स्थूल असू शकतात. उदाहरणार्थ त्यांच्या शरीरात हातावर, नितंबावर आणि पाठीवर चरबी जमा होते. ही चरबी फक्त कंबर आणि नितंब गुणोत्तराद्वारे लक्षात येऊ शकते."
पोटावरील लठ्ठपणा का येतो?
सहसा एखाद्या व्यकीच्या शरीराच्या दिसण्यावरूनच आपण ती व्यक्ती स्थूल आहे की नाही हे ठरवतो. मात्र चरबी ही फक्त शरीराच्या बाहेरच्या बाजूलाच नाही तर आतील अवयवांमध्ये देखील साठवली जाते. त्याला 'व्हिसरल फॅट' (visceral fat) असं म्हणतात.
 
चरबी आपल्या आतड्यांमध्ये साठवली जाते, यकृतात जमा होते, असं डॉ. अश्विन म्हणतात.
या प्रकारचे शरीरात चरबी जमा होण्यामागे पुढील महत्त्वाची कारणं असल्याचं डॉ. अश्विन सांगतात:
 
1) आहार: भारतीय लोक खूप जास्त प्रमाणात भातासारखे स्टार्च असणारं अन्न खातात. त्यांच्या आहारात फार थोड्या प्रमाणात प्रथिनं असतात. त्याचबरोबर ते आरोग्यासाठी अपायकारक असं 'जंक फूड' खातात.
 
2) मद्यपान: मद्यामध्ये पोषकद्रव्ये नसतात. मात्र त्यात खूप जास्त प्रमाणात कॅलरी असतात. यालाच एम्टी कॅलरीज असं म्हणतात. या कॅलरीज थेट यकृतात जातात आणि तिथे जाऊ चरबीच्या रुपात साठवल्या जातात.
 
3) व्यायामाचा अभाव: अलीकडच्या काळात बहुतांश काम बैठ्या स्वरुपात असते.
 
पोट सुटणं (Abdominal Obesity) किती धोकादायक असतं?
पोटावरील लठ्ठपणामुळे अनेक आजार होऊ शकतात, असं डॉ. अश्विन सांगतात.
 
1) मधुमेह: मद्यासह अनेक गोष्टींमुळे यकृतात चरबी जमा होते. जर स्वादुपिंडात (pancreas)फक्त 1 ग्रॅम चरबी जरी जमा झाली तरी त्यातून मधुमेह होऊ शकतो.
2) हृदयविकाराचा झटका: चरबी जर ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठू लागली (atherosclerosis)तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
3) स्ट्रोक (मेंदूच्या रक्तपुरवठ्यात अडथळा): मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये जर चरबी जमा होऊ लागली तर त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते.
4) उच्च रक्तदाब: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठल्यानं रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अधिक दाबाची आवश्यकता पडते. यातूनच उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
5) कर्करोग: अलीकडच्या काळात झालेल्या वैद्यकीय अभ्यासातून असं आढळून आलं की लठ्ठ लोकांमध्ये निरोगी वाढीच्या अभावामुळे कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.
6) झोपेशी निगडीत श्वसन विकार (Obstructive sleep apnea): लठ्ठ लोक जास्त घोरतात. ही देखील एक समस्या होऊ शकते.
 
पोटाशी निगडीत लठ्ठपणा दूर कसा करायचा?
याबाबतीत डॉ. अश्विन म्हणतात, सर्वात आधी तुम्ही आहारात बदल केला पाहिजे. योग्य आहार घेतला पाहिजे.
भारतीय आहारात साधारणपणे 70 टक्के स्टार्च, 20 टक्के प्रथिनं आणि 10 टक्के चरबी असते. यामुळेच लठ्ठपणा वाढतो, असं ते सांगतात.
"एका चांगल्या किंवा निरोगी आहारात 50-55 टक्के स्टार्च, 30-35 टक्के प्रथिनं आणि 10-15 टक्के चरबी असली पाहिजे," असं ते पुढे सांगतात.
ते म्हणतात की याचप्रकारे मद्यपानाचे प्रमाण कमी केलं पाहिजे आणि दररोज व्यायाम केला पाहिजे.
"पोटाचा घेर वाढलेला असणं किंवा पोट सुटलेलं असणं ही काही साधी बाब नव्हे. ते एक लक्षण आहे. आपण त्यावर लक्ष देण्याची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत आपण आहारात आणि आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे," असं ते म्हणतात.
 
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit