गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

नवविवाहित शिक्षकाची पत्‍नी

एका तरुण शिक्षकाचे नुकतेच लग्न झाले होते. त्याला टापटिपीची व व्यवस्थिपणाची खूप आवड होती. लग्नापूर्वी तो स्वत: हौशीने घर नीटनेटके ठेवायचा. थोडासाही गबाळेपणा त्याला सहन होत नसे.
पण दुदैवाने त्याची पत्नी म्हणजे अगदी दुसरे टोक होती. ती लग्न होऊन घरात आली आणि तिने सगळे घर अस्ताव्यस्त करून टाकले. ती तिच्या नटण्या- मुरडण्याच्या नादात घरात काडीचेदेखील लक्ष देत नव्हती.
नवविवाहित शिक्षकाने तिला प्रेमाने समजावले, 'प्रिये! तू होमवर्क नीट करत नाहीस, हे काही बरोबर नाही. व्यवस्थिपणाच्या परीक्षेत अशानं तू नापास होशील. यापुढे मन लावून व्यवस्थित होमवर्क करत जा. मी तुला पूर्ण पैकी पूर्ण मार्क देत जाईन.'
मात्र, त्या शिक्षकाची पत्नीदेखील वस्ताद होती.
ती म्हणाली, गडे! मला किनई होमवर्क कसा करायचा हेच मुळी माहीत नाही. आतापर्यंत मला कोणी शिकवलंच नाही होमवर्क कसा करायचा ते. असं करा ना गडे! यापुढे माझी होमवर्कची शिकवणी तुम्हीच घ्या. आणि तिच्या खडीसाखरेच्या बोलण्याने शिक्षक महाशयांची स्वारी विरघळली. आता त्यांनी कायमचीच तिची होमवर्कची शिकवणी घेतलेली आहे. दुदैवाने त्यांच्या नशिबात एवढी मठ्ठ विद्यार्थिनी आली आहे, की त्यांना दररोज तेच तेच होमवर्क पुन्हा पुन्हा करून दाखवावे लागते. तरी अजूनही तिच्या डोक्यात प्रकाश पडत नाही.