शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (12:19 IST)

किती तरी दिवसांत

marathi kavita
किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
 
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच
 
केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय
 
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी
 
बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा
 
कवी- बा.सी.मर्ढेकर