शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

देवीचे अर्धे पीठ- सप्तशृंगीदेवी

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून पासष्ट किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.

  WD
आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात एकशे आठ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे. देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे.

  WD
डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती. शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्‍वकर्माचा तीक्ष्ण परशू व चिलखत समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे.

मूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्‍चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

  WD
सुमारे 472 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते. चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रूप हसरे, तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा, असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते. नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात. देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. देवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येते. तिला अकरा वार साडी लागते. चोळीसाठी तीन खण लागतात. नऊ दिवस विविध रूपांत पूजा-अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते. त्यानंतर नेवैद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्‍यातील दरेगावच्या पाटील कुटुंबीयांस आहे; मात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही.

गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्‍चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी 108 कुंडे होती; मात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.

  WD
गडाची व्यवस्था पाहण्यासाठी ग्रामपंचायत आहे. याशिवाय देवीचे विश्‍वस्त मंडळही आहे. त्यांच्यातर्फे येथे बऱ्याच सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या निवासाची उत्तम व्यवस्था गडावरच आहे. याशिवाय जेवणाच्या रूपातील प्रसादही भाविकांना दिला जातो. भाविकांच्या गर्दीमुळे गडावरच आता सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉटेलसह सर्व वस्तूंची दुकाने येथे आहेत.

गडावर जाणे आता सर्वांना सहजशक्‍य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या आगारांनी नवरात्रोत्सवाची गर्दी लक्षात घेऊन थेट गडापर्यंत जादा बस सुरू केल्या आहेत. या काळात खासगी गाड्यांना गडाखालीच उभे करावे लागते. त्यापुढे फक्त एसटी बस जाऊ शकतात. त्यामुळे थेट गडापर्यंत जाता येते. याशिवाय, गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ता आहे.

कसे जाल?
हवाई मार्ग- सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी जवळचे विमानतळ मुंबई किंवा पुणे आहे. तेथून नाशिकला यावे लागेल.
रेल्वे मार्ग- सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक आहे.
रस्ता मार्ग- सप्तश्रृंगी गड नाशिकपासून ६५ किलोमीटरवर आहे. नाशिकहून सप्तश्रृंगी देवीला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तसेच खासगी गाड्याही उपलब्ध आहेत.