वास्तूला अनुकूल बनविण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपयोगी पडते. वास्तुदोष असल्यास घरात अनेक अडचणी, संकटे, दुःख, निराशा यांचे राज्य असते.
घरातील माणसे या दोषामुळे हवालदिल झालेली असतात. अशावेळी या वास्तुशास्त्राचे बोट धरून गेल्यास सुख, समृद्धी, समाधान घरात नांदते. म्हणून या शास्त्राचा कर्ता भगवान विश्वकर्मा याने हे शास्त्र आपल्या हवाली करून आपल्या जगण्याचा मार्ग सोपा केला आहे.
आधुनिक फ्लॅटसंस्कृती आता सगळीकडेच पसरली आहे. कप्पेबंद अशा या व्यवस्थेत वास्तू आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार वा आपल्याला अनुकूल अशी असतेच असे नाही. अनेकदा त्यात वास्तुदोष असल्याचे समजल्यानंतर तिला अनुकूल बनविणे शक्य नसते. पैशांचा अभाव वा वास्तूची रचना ही त्याची कारणे असतात. पण अशावेळी निराश होण्याचे कारण नाही.
घरातील सामान, वस्तूंच्या जागा बदलून आपण वास्तुदोष काही मर्यादेपर्यंत नक्कीच कमी करू शकते. उदाहरणच घेऊ. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला स्वयंपाकघर हवे. तसे नसल्यास अग्नी आपल्याला अनुकूल रहात नाही.या परिस्थितीत घरातील फ्रीज, टीव्ही या इलेक्ट्रॉनिक वस्तू या दिशेला ठेवून आपण ती दिशा अनुकूल करून घेऊ शकतो. घराच्या पूर्व व उत्तर दिशेला काहीही ठेवायला नको. त्या रिकाम्या राहायला हव्यात. पण ते शक्य नसल्यास पूर्व वा उत्तर दिशेला ठेवलेल्या वस्तूच्या दीडपट वजनाच्या वस्तू नैरृत्य कोपर्यात ठेवल्या पाहिजेत. कारण नैरृत्य कोपरा जड आणि ईशान्य कोपरा हलका असला पाहिजे.
घरातील घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले पाहिजे. असे केल्यास चांगला काळ आपल्या जीवनात येतो. त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागत नाही. ईशान्य कोपर्याला कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवले पाहिजे. त्यासाठी तेथे पाणी भरलेला माठ ठेवायला हवा. त्याचा सकारात्मक परिणाम होतो. घरातील महत्त्वाच्या कागदपत्रांना पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवले पाहिजे. असे न केल्यास त्याच्याशी संबंधित काहीतरी अघटित घडते. अशाच प्रकारे बेडरूम, पूजेची खोली, तिजोरी, बाथरुम, ड्रॉईंग रूम, किचन, मुख्य दार, खिडकी यात बदल करून वास्तुदोष दूर करता येतो.
वास्तुशास्त्र काय सांगते? तर प्रत्येक वस्तूचे स्थान काय आहे, ती कुठे असायला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन करते. घरात स्वयंपाकघर दक्षिण पूर्व कोपऱ्यात असावे. पूजेची खोली वा स्थान उत्तर- पूर्व कोपऱ्यात हवे. बेडरूम दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात हवी. पाहुण्यांची खोली व मुलांची खोली उत्तर पश्चिम कोपऱ्यात हवी. पहिल्या खोलीतील बैठक उत्तर-पूर्व बाजूला हवी. झोपताना डोके दक्षिण वा पूर्वेला हवे. याला काही कारणेही आहेत. पूर्वेला सूर्याचे स्थान आहे. तो स्थिर आहे. दिवसभर थकल्यानंतर आपण झोपतो तेव्हा सूर्याची ऊर्जा आपल्या मेंदूला मिळते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काम करण्याची शक्ती आपल्यात उत्पन्न होते. जे डोके उत्तर किंवा पश्चिम दिशेला करून झोपतात ते नेहमी आजारी, रोगी, निराश मनःस्थितीत आढळतात.
वास्तुशास्त्राची काटेकोर अंमलबजावणी नवी वास्तू बांधतानाच होऊ शकते. याचा अर्थ सध्या अस्तित्वात असलेली वास्तू या शास्त्रास अनुकूल करता येत नाही, असे नाही. सुख, समृद्धी, समाधान हवे असल्यास घर, दुकान यात अनुकूल बदल केले पाहिजे. त्याचवेळी वास्तुशास्त्र म्हणजे लॉटरीचे तिकिट नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. हे तिकिट लागले की जो धनलाभ होतो, तसाच लाभ लगेचच बदल केल्यानंतर मिळतो असे नाही. तो हळूहळू जाणवू लागतो. अनुकूल वास्तूरचना झाल्यानंतर आपल्य मनात सुख, समाधान या भावना वास करू लागतील. आनंद, उत्साह आपल्या आयुष्यात येतील. नवी ऊर्जा मिळेल. कोणतेही काम हाती घेतल्यास यश लाभेल. हे बदल हळूहळू जाणवतील. वास्तुशास्त्र पाळल्यास ही फळे मिळतील.