मुंबई हल्ल्याशी ब्रिटन 'कनेक्शन'?
मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश नागरिकाचा हात आहे का याचा तपास आता घेतला जात आहे. लंडनच्या इव्हिनिंग स्टॅंडर्ड या दैनिकाने भारतीय सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने या हल्ल्यात काही ब्रिटिश बंदुकधारी होते, असे म्हटले आहे. एका युरोपीयन संसदपटूनेही याला दुजोरा दिला आहे. ही शक्यताही नाकारता येत नाही. या क्षणी आम्हीही ती पडताळून पहात आहोत, असे गृहसचिव जॅकी स्मिथ म्हणाल्या. भारताला सर्वतोपरी मदत देण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. या हल्ल्यात ब्रिटिश नागरिकाचा हात असल्याबद्दल आताच काही बोलणे घाईचे ठरेल. मात्र तसे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे ब्रिटिश सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. इव्हिनिंग स्टॅंडर्डने आपला आजचा मथळाच 'मुंबई गनमेन 'वेअर ब्रिटीश' असा दिला आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या एकूण आठ आरोपींना अटक केली. त्यात दोन पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश असल्याचे या बातमीत म्हटले आहे. ब्रिटनमध्ये पाकिस्तानी वंशाचे साडेसात लाख लोक रहातात. भारतीयांनंतर सर्वाधिक पाकिस्तानी ब्रिटनमध्ये आहेत. लंडनमध्ये एका बसमध्ये जुलै २००५ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात पन्नास लोक ठार झाले होते. हे बॉम्बस्फोटही पाकिस्तानी मुळाच्या ब्रिटिश नागरिकांनी घडवले होते. शेकडो ब्रिटिश- पाकिस्तानी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात गेले आणि त्यांनी दहशतवादी ट्रेनिंग घेतल्याचे ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी या हल्ल्यात ब्रिटिश मुस्लिम असल्याच्या वृत्तावर आताच घाईघाईने निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल, असे म्हटले आहे.