शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By अभिनय कुलकर्णी|

मुंबईवरील हल्ला ३९ पाकिस्तानी अतिरेक्यांकडून

गरज पडल्यास ताजमहल हॉटेल उध्वस्त करून टाका, अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या होत्या अशी माहिती मुंबईवरील हल्ल्यात अटक केलेला अतिरेकी अजमल आमीर कसाब याने दिली आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कसाब अवघ्या २१ वर्षाचा आहे. ताज हॉटेल उडवून देण्याइतपत स्फोटके त्यांच्याकडे होती, अशी कबुलीही त्याने दिली.

या अतिरेक्यांना ताज उध्वस्त करून टाकायचे होते. दोन महिन्यांपूर्वीच इस्लामाबादचे जे. डब्ल्यू. मॅरीयेट हॉटेलही असेच उध्वस्त केले होते. त्याचीच पुनरावृत्ती त्यांना इथे घडवायची होती.

कसाब हा पाकिस्तानातील फरीदकोट येथील गिपालपुरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी पकडल्यानंतर आता आपले काही खरे नाही हे त्याच्या लक्षात आले आहे. त्याचा एक साथीदार मृत्युमुखी पडला आहे. त्याचा मृत्यू पाहिल्यानंतर आता कसाबला जगायचे आहे. तसे त्याने मुंबई पोलिसांनाही सांगितले आहे. मुंबईत हिंसाचार करून झाल्यानंतर तो आणि त्याचे ३९ साथीदार आरामात परततील, असे त्याला सांगण्यात आले होते.

त्यांच्या नियोजनानुसार गुरूवारी त्यांना मुंबईतून परतायचे होते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे त्यांनी कसे परत यावे याचा मार्गही त्यांना आखून देण्यात आला होता. काही मिहन्यांपूर्वीच त्याने मुंबईत येऊन तिथली सगळी माहिती घेतली होती. त्यावेळी त्याच्या बरोबर आठ जण होते. विद्यार्थी असल्याचे भासवून त्यांनी कुलाबा मार्केटमध्ये खोलीही घेतली होती.

ते सुरक्षित आपल्या गावी परततील अशी खात्री त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे तरी ते या मोहिमेत सामील होतील अशी त्यांची भरती करणार्‍या अतिरेक्यांची खात्री होती.

कसाबने दिलेल्या माहितीनुसार लष्कर - ए- तैय्यबाने या सगळ्यांना ट्रेनिंग दिले होते. हे ट्रेनिंग नेहमीच्या हल्ल्यांपेक्षा वेगळे होते. त्याला दाऊरा- ए- शिफा असे नाव दिले होते. कमांडोसारखी कारवाई करण्याचे हे ट्रेनिंग होते.

कसाबने त्याच्या काही साथीदारांची नावेही सांगितली. ते सगळे पाकिस्तानी आहेत. ही नावे अशीः अबू अली, फहाद, ओमर, शोएब, उमर, अबू आकाशा, इस्माईल, अब्दूल रहमान (बडा) व अब्दूल रहमान (छोटा).