शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:20 IST)

देशातच बनवले जाणारे मोनो रेलचे डबे

मेट्रो रेल्वेला पूरक म्हणून मोठा गाजावाजा करत २०१४ मध्ये एमएमआरडीएने मोनो रेलचा पहिला टप्पा मुंबईत सुरु केला. संत गाडगे महाराज चौक ( सात रस्ता ) ते चेंबूर अशा एकुण २० किलोमीटरच्या मोनो रेल मार्गावर दर पाच मिनीटाला मोनो रेलची सेवा सुरु ठेवण्याचे नियोजन होते. पण विविध कारणांमुळे दुसरा टप्पा उशीराने सुरु झाला तसंच संपुर्ण मार्गावर पुर्ण क्षमतेने मोनो सेवा सुरु राहू शकली नाही. वैशिष्टयपुर्ण अशी मोनो रेल बनवणाऱ्या मलेशियातील कंपनीने अटी शर्ती पुर्ण न केल्याने एमएमआरडीने अखेर कंत्राट रद्द केले. हा मार्ग सुरु ठेवण्याची जबावदारी मग एमएमआरडीएने स्वतःवर घेतली. मात्र वारंवार निघणारी दुरुस्तीची कामे, सुट्या भागांची समस्या यामुळे मोनो रेल सेवा रखडत, प्रचंड तोट्यात सुरु होती.
 
अखेर मोनो सेवा पुर्ण क्षमेतेने सुरु ठेवण्यासाठी आवश्यक १० अतिरिक्त मोनो रेल गाड्या देशातच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी पहिली गाडी येत्या जानेवारीत दाखल होणार असल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. मोनो रेलच्या गाड्यांचे उत्पादन हे देशातच केले जाणार आहे. ‘मेधा सर्वो ड्राइव्ज प्रा.लि. ‘ या कंपनीला १० मोनो रेल गाड्यांच्या निर्मितीचे ५९० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याचं एमएमआरडीएने प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. पहिली गाडी जानेवारी २०२३ मध्ये मुंबईत दाखल होणार असून १० वी गाडी ही २०२४ अखेरीस दाखल होणार आहे. यामुळे मोनो रेलच्या ताफ्यात गाड्यांची संख्या वाढणार असून दर पाच मिनीटांनी मोनो रेल सेवा देणे शक्य होणार आहे. यामुळे भविष्यात प्रवासी संख्येतही वाढ होणार आहे. देशातच बनवले जाणारे मोनो रेलचे डबे हे देशातील इतर मेट्रो रेल्वे प्रमाणे स्टेनलेस स्टीलचे वजनाने हलके आणि दणकट असणार आहेत, यामुळे मोनोचा वेगही वाढणार आहे. त्यातच देशात निर्मिती केली जाणार असल्याने मोनो रेलच्या डब्यांच्या देखभालीचा खर्चही कमी असणार आहे.