शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (16:33 IST)

ओव्हरहेड वायर तुटली आणि गर्दीचा कडेलोट झाला; मुंबई लोकल जीवघेणं रेल्वे नेटवर्क ठरतंय का?

mumbai local train
सोमवारी (5 ऑगस्ट) मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी पहायला मिळाली. रेल्वे लोकल जवळपास एक तास उशिराने धावत असल्याने सीएसएमटी, दादर, घाटकोपर, ठाणे या स्थानकावर रेल्वे प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरून गेले होते.
 
येणाऱ्या प्रत्येक लोकलमध्ये दरवाजाच्या अगदी शेवटच्या इंचापर्यंत प्रवासी चढत होते आणि दरवाजाला लटकून प्रवास करत होते.
 
सोमवारी दुपारी ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं.
 
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क. जगातलं एक जुनं, स्वस्त, अत्यंत व्यग्र आणि कदाचित सर्वांत जीवघेणं रेल्वे नेटवर्क. या रेल्वेमध्ये 'पीक अवर्स'मध्ये म्हणजे ऑफिसला जाताना किंवा ऑफिस सुटताना ट्रेन स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की प्रवाशांना अनेकदा पाय ठेवायलाही जागा नसते.
 
अत्यंत चिरडून टाकणाऱ्या गर्दीत मुंबई लोकलमधून दररोज जवळपास 63 लाख प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात.
 
1925 मध्ये सुरू झालेली ही लोकल रेल्वे सेवा आता 100 वर्षांची होणार आहे.
 
या रेल्वे नेटवर्कला 'मुंबईची लाईफलाईन' असंही म्हटलं जातं, पण “ही लाईफलाईन आता डेथलाईन बनली आहे,” असं प्रवासी म्हणू लागले आहेत.
 
याचं कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांत मुंबई लोकलमधून प्रवास करताना दररोज सरासरी सात जणांचा मृत्यू होतोय. म्हणजे, दर तीन-साडेतीन तासाला एक मृत्यू!
 
2023 या एकट्या वर्षात या रेल्वे नेटवर्कमध्ये अपघातात 2590 जणांचा मृत्यू झाल्याचं स्वतः रेल्वे पोलिसांचा अहवाल सांगतो. म्हणजेच दररोज सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू आणि आजही ही मालिका सुरूच आहे.
 
रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की, मृत्यूंची ही संख्या कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
 
‘लाईफलाईन नव्हे डेथलाईन’
25 वर्षांचा अवधेश दुबे मुंबई जवळच्या डोंबिवलीमध्ये राहायचा. आयआयटी पटनामधून एमबीएचं शिक्षण घेत होता आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी जॉबही करत होता.
 
23 एप्रिल 2024 या दिवसाची सुरुवात अवधेशसाठीही सामान्य होती. तो आपल्या घरातून सकाळी 8.15 वाजता ऑफिसला जाण्यासाठी निघाला. घरातून बाहेर पडताना त्याने आपला मोठा भाऊ दीपकला ‘दरवाजा बंद कर’ असं सांगितलं. त्यावेळी दीपकला स्वप्नातही वाटलं नाही की, आपल्या लहान भावासोबतचं हे त्याचं शेवटचं संभाषण ठरेल.
 
मुंबईतील इतर लाखो प्रवाशांप्रमाणेच अवधेशसुद्धा मुंबई लोकलने प्रवास करूनच ऑफिसला पोहोचत होता. त्यादिवशी तो डोंबिवली रेल्वे स्टेशनहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढला. गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली.
 
गर्दीमुळे तीन ट्रेन सोडल्यानंतर तो कसाबसा चौथ्या ट्रेनमध्ये चढला. पण पुढच्या दोन रेल्वे स्टेशनदरम्यान तो ट्रेनच्या दरवाजातून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
 
“मुंबईची ही लाईफलाईन आता डेथलाईन झाली आहे,” असं व्यथित होऊन दीपक दुबे बीबीसीला सांगतात.
 
मुंबईच्या या लोकलमधून प्रवास करताना जेवढे मृत्यू होतायत, जवळपास तेवढेच प्रवासी जखमीसुद्धा होत आहेत. 2023 या वर्षभरात 2 हजार 441 प्रवासी जखमी झाले आहेत. मे 2022 आणि मे 2024 मध्येही जखमींची संख्या साधारण तेवढीच आहे.
 
20 वर्षांच्या रोहिणी बोटे हाऊसहेल्प म्हणून काम करतात. 8 जुलै 2024 रोजी प्रवास करताना प्लॅटफॉर्मवरून त्या रेल्वे ट्रॅकवर पडल्या. त्यांच्या संपूर्ण अंगावरून ट्रेन गेली. या अपघातात त्यांचा जीव वाचला खरा पण दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.
 
रोहिणी यांचे पती राजेश बोटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “पावसामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी होती. या गर्दीत त्या खाली रेल्वे ट्रॅकवर पडल्या. समोरून रेल्वे आल्याने त्यांच्या अंगावरून रेल्वे गेली आणि त्यांचे दोन्ही पाय जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाली ज्यात त्यांचा गुडघ्याखाली पाय कापावा लागला आहे.”
 
देशभरातून शिक्षण, रोजंदारी, करिअर, उद्योग, मजुरी अशा संधी मिळवण्यासाठी लोक मुंबई गाठतात. त्या सर्वांना प्रवासाचा सर्वांत स्वस्त पर्याय आहे तो फक्त मुंबई लोकल रेल्वेचा.
 
मुंबई लोकल नेटवर्क कसं आहे?
मुंबई लोकल रेल्वेचे दोन भाग आहेत. यात एक आहे मध्य रेल्वे जी 234 किमी पसरलेली आहे आणि पश्चिम रेल्वे 124 किमीपर्यंत लांब आहे. आणि एका किलोमीटरच्या प्रवासासाठी आकारले जातात फक्त 12 पैसे. म्हणजे भारतीय 1 रुपयाच्या फक्त 12 टक्के.
 
मुंबईचं भौगोलिक स्थान पाहाता संपूर्ण मुंबईभर प्रवासासाठीचा हा सर्वांत वेगवान आणि परवडणारा पर्याय आहे. त्यामुळे लाखो लोक प्रत्येक मिनिटाला या रेल्वेतून प्रवास करत असतात.
 
या नेटवर्कमध्ये रेल्वेच्या दररोज 3204 फेऱ्या दिल्या जातात. ज्यातून जवळपास 63 लाख प्रवासी प्रवास करतात. 63 लाख ही माद्रिद किंवा टोरंटोसारख्या शहरांची एकूण लोकसंख्या आहे. किंवा असंही म्हणता येईल की डेन्मार्क, सिंगापूर, बल्गेरियासारख्या देशांएवढी लोकसंख्या या मुंबई लोकल नेटवर्कमधून रोज ये-जा करते.
 
मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमधल्या 12 डब्ब्यांच्या एका ट्रेनची प्रवासी क्षमता साधारण 3 हजार 750 इतकी आहे. परंतु त्यातून क्षमतेपेक्षा जवळपास दीड टक्के जास्त प्रवासी प्रवास करतात असा रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी पट जास्त आहे. (मुंबई लोकल रेल्वेचे हे फोटो त्यासाठी पुरेसे बोलके आहेत.)
 
‘बांगड्या, घड्याळं तुटतात, ड्रेस फाटतात, जखम होते’
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या अक्षरा पटेल गेल्या 25 वर्षांपासून मुंबई लोकल रेल्वेतून प्रवास करत आहेत. महिला प्रवासी म्हणून हा प्रवास अधिक आव्हानात्मक आणि धोकादायक बनला आहे, असं त्या सांगतात.
 
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, “एवढी गर्दी असते की आम्हाला ट्रेनमध्ये चढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आम्ही ट्रेनच्या डब्यात चढल्यानंतर मोकळा श्वास घेण्याइतपतही हवा जाण्यास जागा नसते. काही महिला प्रवाशांना बसायला मिळतं पण बहुतांश उभं राहूनच प्रवास करतात. धक्काबुक्की होते. यातून अनेकदा भांडणं होतात. महिलांच्या बांगड्या तुटतात, ड्रेस फाटतात, अनेकदा हाता-पायला मुका मार लागतो.”
 
लोकल रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी सुमारे 20-22 टक्के प्रवासी महिला आहेत. एका रेल्वेत महिलांसाठी एकूण पाच कंपार्टमेंट राखीव असतात. परंतु महिला प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत हे पुरेसं नाही असं महिला प्रवाशांचं म्हणणं आहे.
 
अक्षरा सांगतात, “महिलांसाठी हे जास्त त्रासदायक आहे. कारण त्यांना पहाटे उठून स्वयंपाक करून, मुलांना त्यांच्या शाळेत सोडून ऑफिसला पोहचायचं असतं. या सर्व आव्हानांमध्ये आता प्रवास सुद्धा आमच्यासाठी एक आव्हान बनलं आहे.”
 
गेल्या 10 वर्षांत रेल्वेत मृत्यू कसे आणि कुठे झाले?
गेल्या दहा वर्षांत कोव्हिड काळातील (2020 आणि 2021) ही दोन वर्षं वगळल्यास मुंबई लोकल रेल्वेतून प्रवास करताना सरासरी नऊ ते सात जणांचा मृत्यू होत असल्याचं रेल्वे पोलिसांच्याच रिपोर्ट्समधून स्पष्ट होतं.
 
2023 सालच्या अहवालानुसार 12 महिन्यात 2590 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
रेल्वे रुळ ओलांडताना - 1277
चालत्या रेल्वेतून पडून - 590
नैसर्गिक मृत्यू - 529
रेल्वेच्या हद्दीतील आत्महत्या - 121
रेल्वे पोलला धडकून- 4
प्लॅटफॉर्मच्या गॅप्समध्ये पडून - 10
इलेक्ट्रिक शॉक लागून- 14
इतर- 32
मृत्यूचे कारण माहिती नसलेले – 13
या वर्षी म्हणजे 2024 हे वर्ष सुरू झाल्यापासून पहिल्या पाच महिन्यात 1 जानेवारी 2024 ते 31 मे 2024 या कालावधीत एकूण 1003 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे दरदिवशी सरासरी 6-7 मृत्यू याही वर्षी झाल्याचं स्पष्ट होतं. तर 2022 मध्येही साधारण मृत्यू होणाऱ्यांची संख्या सरासरी तेवढीच आहे.
 
2013 ते 2021 या आठ वर्षांतही रेल्वेतून दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंचा आकडा फारसा कमी झालेला नाही. 2013 ते 2019 दरम्यान दररोज नऊ ते सात जणांचा मृत्यू होत असल्याचं दिसतं.
 
2020 आणि 2021 या दोन्ही म्हणजे कोव्हिड काळात लॉकडाऊन दरम्यान प्रवासी संख्या कमी होती यामुळे या दोन वर्षांत मृत्यूंचा आकडा हा दररोज तीन ते चार इतका होता.
 
‘हे लज्जास्पद आहे’- मुंबई हायकोर्ट
मुंबई उच्च न्यायालयानं देखील हे रेल्वेचं अपयश असल्याचं म्हटलं आहे.
 
रेल्वे पोलिसांच्या ज्या अहवालाच्या आधारे बीबीसीनं ही बातमी केली आहे. त्याच अहवालाच्या आधारे एक पीआयएल मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
 
त्यावर सुनावणी करताना “मुंबई लोकल ट्रेनमध्ये लोकांना जनावरांप्रमाणे प्रवास करताना पाहून लाज वाटते. ही समस्या अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी रेल्वेच्या उच्चस्तरिय अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे लागेल,” असं म्हटलंय.
 
मृत्यू होण्याची कारणे आणि यावर उपाय काय आहेत?
मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अकलेकर गेली अनेक वर्ष या रेल्वे नेटवर्कचं वार्तांकन करत आहेत.
 
ते सांगतात, “दररोज दहा ते अकरा लोकांचा मृत्यू या सबरबन रेल्वेमध्ये होतो हे वास्तव आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की मुंबई रेल्वे सॅच्युरेटेड झाली आहे. ही समान रेल्वे सिस्टम देशातील विविध राज्यांना मुंबईशी जोडण्यासाठी वापरली जाते. अधिक रेल्वे रुळांची आवश्यकता आहे, विस्तार करण्याची आवश्यकता आहे. काम होत आहे पण ते धीम्या गतीने होत आहे. मोकळी जागाही उपलब्ध नाही. मुंबईसाठी पर्यायी ट्रांसपोर्टेशनची गरज आहे.”
 
रेल्वेचं 2023-24 सालचं बजेट 2.44 लाख कोटी आहे. यापैकी 789 कोटी हे मुंबई उपनगरातील रेल्वे प्रकल्पांच्या विस्तारासाठी देण्यात आले होते.
 
जगभरातील अनेक शहरांमध्ये लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करत आहेत परंतु कुठेही मृत्यू आणि जखमींची संख्या एवढी नाही, असं परिवहन तज्ज्ञ अशोक दातार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
“टोकयोमध्ये दर दिवशी 1 कोटी प्रवासी प्रवास करत आहेत. तसंच हाँगकाँग, शांघाय या शहरांमध्येही रेल्वेची प्रवासी संख्या जास्त आहे. परंतु तिकडे मेट्रो आहेत. तिथे टेक्नॉलॉजीचा वापर करून सुरक्षित प्रवासाची सेवा दिली जाते. हे देश करू शकतात मग भारतात हे का शक्य नाही?” असंही अशोक दातार म्हणाले.
 
या संदर्भात बीबीसी मराठीने मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांची भेट घेतली.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “रेल्वे अपघात कमी करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक ओलांडू नये म्हणून प्लॅटफॉर्मच्या शेवटी कुंपण घालणे, फूट ओव्हर ब्रीजचा वापर करणे. तसंच फास्ट आणि न थांबणाऱ्या रेल्वेंबाबत सतत घोषणा करणे, पीक हावरमध्ये जेव्हा जास्त गर्दी होते त्यावेळी गर्दीची विभागणी योग्य पद्धतीने करणे, विविध आस्थापनांना गर्दीचं नियोजन होण्यासाठी वेळ बदलण्याबाबत विनंती करणे जे दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरेल.”
 
पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितलं की,“2004 तुलनेत 2024 मध्ये 68 टक्के क्षमता जास्त वाढवली आहे. त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. महिला प्रवाशांवरही आम्ही विशेष लक्ष दिलं आहे. गेल्या काही वर्षांत 19 किमी ट्रॅक आम्ही वाढवले आहेत.”
 
(निर्मिती – नीलेश धोत्रे)