राज ठाकरेंना अटक, आझमीस जामीन मंजूर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांना भडकाऊ वक्तव्य करून शहरातील सामाजिक सौहार्द बिघडवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाचवेळी अटक केली आहे. आझमी यांना भोईवाडा न्यायलयात हजर करण्यता आल्यानंतर दहा हजार रूपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. राज यांना विक्रोळीतील न्यायालयात हजर करण्यात येईल. भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी अटक होणारे राज हे ठाकरे कुटुंबातील दुसरे व्यक्ती आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त डी. एन. जाधव व राज्याचे पोलिस महासंचालक पी. एस. पसरीचा यांच्यासोबत सकाळी तातडीची बैंकक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर अटकेस हिरवा कंदील दिला होता. दरम्यान राज ठाकरेंनी आपले सासरे नाट्यमिर्माते मोहन वाघ यांच्यामार्फत 'मनसे'च्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. दहावीची बोर्डाची परिक्षा असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पोलिस व्हॅनमधून त्यांना विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले. मुंबई पोलिसांनी राजविरूद्ध शहरात हिंसा भडकवण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या 153 अ, 153 ब, व कलम 117 कलमाअंतर्गत आरोप दाखल केला होता. परप्रांतीयांना मुंबईत 'स्थापना दिन' साजरे करू दिले जाणार नाही, असे वक्तव्य केल्यानंतर वादास तोंड फुटले होते. समाजवादी पक्षाने मुंबईत 'देश बचाव' रॅली काढून आग भडकावण्याचे काम केले होते. यानंतर मुंबई, नाशिकसह काही शहरांत परप्रांतीयांविरूद्ध हल्ल्यास सुरूवात झाली होती. दरम्यान राज ठाकरेंच्या अटकेनंतर मुंबईतील दादर येथील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. कोल्हापुरमध्येही राज समर्थकात असंतोष भडकला असून तीन गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. गोरेगांव व जोगेश्वरीमध्येही मोडतोड. कोल्हापुरमध्येही राज समर्थकात असंतोष भडकला असून तीन गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. पुणे व परभणीतही 'मनसे'चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून पंधरा वाहनांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान मुंबई शहरात तणावपूर्ण शांतता असून संपूर्ण शहरात निमलष्करी दल व पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.