कर्नाटकात सापडली १६२ कोटी रूपयांची अघोषित मालमत्ता
कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रदेश महिला अध्यक्ष आणि एका मंत्र्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल १६२ कोटी रूपयांची अघोषित मालमत्ता आढळून आली आहे. आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्यामध्ये ४१ लाख रूपये रोख रकमेसह सोने जप्त केले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गोकाक आणि बेळगावमधील मालमत्तेवर छापे टाकले. यामध्ये २० लाख रूपयांची रोख रक्कम आढळून आली. सापडलेल्या रकमेचा हिशोब हेब्बाळकर यांना आयकर विभागास देता आला नाही. त्यांच्याबरोबरच कर्नाटकचे लघुउद्योग मंत्री रमेश जारकिहळ्ळी यांच्याकडील मालमत्तेवरही छापा टकण्यात आला. त्यांच्याकडे ११५ कोटींचा काळा पैसा सापडला. ते सौभाग्यलक्ष्मी शुगर लि.चे प्रमुख प्रमोटर आणि संचालक आहेत. आयकर विभागाने केलेल्या चौकशीत जारकिहळ्ळी यांच्या नातेवाईक आणि परिचितांच्या खात्यांवर कोट्यवधी रूपये असल्याचे समोर आले आहे.