बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2023 (22:46 IST)

हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार; रस्ते, पूल वाहून गेले

rain in himachal pradesh
हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे.
 
नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून भूस्खलन, घरे वाहून गेल्याचे प्रकार समोर येत आहेत.
 
आतापर्यंत राज्यात पावसाने 17 जणांचा बळी घेतल्याची माहिती मिळाली आहे. हा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
 
सर्वाधिक नुकसान मंडी आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळालं. याठिकाणी बियास नदीतील पाण्याच्या विसर्गाने गेल्या कित्येक वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला.
 
कुल्लूच्या औटपासून ते मंडीतील धर्मपूरपर्यंत सहा पूल वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. यांपैकी काही पूल हे 100 वर्षांहून जास्त जुने होते.
 
राज्यातील 6 राष्ट्रीय महामार्गांसह 800 इतर लहान-मोठे रस्ते बंद पडले आहेत. सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.
 
काही रस्त्यांवरची परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. कारण या रस्त्यांचा मोठा भाग पाण्यात वाहून गेला आहे तर काही ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते खचले आहेत.
कुल्लूच्या लारजी पॉवर हाऊस येथे पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं. तसंच इतर वीज प्रकल्पही बंद करण्यात आल्याने इतर ज्यांना दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला.
 
सध्या हिमाचल प्रदेशातील 4500 पेक्षाही जास्त वीज ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने वीज गेली आहे. वीज नसल्यामुळे काही ठिकाणी मोबाईल सेवाही बाधित झालेली आहे.
 
पावसाचं रौद्र रुप
शनिवारी सकाळी हिमाचल प्रदेशात पावसाने आपलं रौद्र रुप दाखवण्यास सुरुवात केली. रविवारपर्यंत सोशल मीडियावर पावसाच्या हाहाकारामुळे पाणी जमा झाल्याचे, भूस्खलनाचे अनेक व्हीडिओ व्हायरल होऊ लागले.
 
सकाळी बियास नदीच्या किनाऱ्यावरील पर्यटनस्थळ असलेल्या कुल्लू-मनालीमध्ये बस, वाहनं पाण्यात काडीपेट्यांसारखी वाहताना दिसून आली.
 
काही वेळात हे पाणी कुल्लू खोऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलं. तेथील 100 वर्ष जुना पूल या पाण्यात वाहून गेला. पुढे मंडीजवळच्या पंडोह धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे सर्व गेट उघडावे लागले.
 
काही वेळातच पंडोह बाजार पाण्याने भरून गेलं.
 
येथील रहिवासी रोहित कुमार म्हणतात, “पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करण्याचा वेळही लोकांना मिळाला नाही. सकाळी लोकांची झोपच उडून गेली. धरण प्रशासनाने अचानक इतकं पाणी सोडलं की घरा-घरांमध्ये ते शिरलं. गाड्या अडकल्या, इतकं नुकसान झालं, त्याची भरपाई कोण करेल?
 
काही वेळातच 100 वर्षांपूर्वी बांधलेला पंडोहचा झुलता पुलही नदीत गायब झाला.
पंडोह धरणाच्या पुढेही जिथून बियास नदी वाहते, त्या सगळ्या ठिकाणांवरून नुकसानीच्या बातम्या येऊ लागल्या.
 
बियास नदीच्या किनाऱ्यावरील मंडी शहरात पाण्याची पातळी चिंताजनकरित्या वाढली होती. नदी किनाऱ्यांवरील मंदिरे, घरांमध्ये पाणी शिरलं. काही वेळातच 1877 मध्ये बांधलेल्या व्हिक्टोरिया ब्रिजवरून पाणी वाहू लागलं.
 
मदतकार्यात अडथळे
ढगफुटीसारख्या परिस्थितीमुळे बियास नदीने अनेक ठिकाणी आपलं पात्र बदललं आहे. यामुळे मोठ्या संख्येने लोकांना त्याचा फटका बसला. मनाली प्रशासनाने अडकलेल्या 27 लोकांना वाचवण्यात यश मिळवलं. तर कुल्लूमध्ये रविवारी 7 जणांना वाचवण्यात आलं.
कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितलं, “राज्यात 55 तासांपासून सलग पाऊस सुरू आहे. नद्या नाले तुडुंब वाहत आहेत. दोन दिवसांपासून बचावकार्य सुरू असून अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यात आलं आहे. अजूनही कुल्लूमध्ये काही ठिकाणी पर्यटक अडकलेले आहेत. ते सुरक्षित आहेत, त्यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
 
पावसामुळे मोबाईल कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आमचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे वायरलेस यंत्रणेचीही मदत घेतली जात आहेत.
 
राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी
हवामान विभागाच्या माहितीनुसार रविवारी हिमाचल प्रदेशात सरासरीपेक्षा 10 पट अधिक पाऊस पडला.
 
पावसाने राज्यात किती नुकसान झालं, याची माहिती मिळवण्यात येत आहे.
 
दरम्यान मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी याला राष्ट्रीत आपत्ती जाहीर करण्याची मागणी केली.
 
मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री जगत सिंह नेगी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली असून पूरप्रभावित क्षेत्राचा दौरा करून आढावा घेण्यास सांगितलं आहे.
 
सोबतच हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात बचाव कार्यासाठी 100, 1070 आणि 1077 टोल फ्री नंबरची तरतूद केली आहे.
 
पावसामुळे शाळांना दोन दिवस सुटी देण्यात आली असून पुढेही ती वाढवण्यात येईल, अशी शक्यता आहे.
 
अजूनही राज्यातील काही भागात थांबून-थांबून पाऊस होत आहे. पाऊस आणखी वाढला तर परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते. अशा स्थितीत मदतकार्याच्या दृष्टिकोनातून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 
Published By- Priya Dixit