1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (19:57 IST)

धीरज साहू कोण आहेत, ज्यांच्या घरातून 300 कोटींहून अधिक रोकड जप्त केली गेली

Dheeraj Sahu
ओडिशाच्या बलांगीर शहरातील सूदपाडा येथे असलेल्या देशी दारूच्या कारखान्यावर 6 डिसेंबरला छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत सापडलेली रक्कम मोजण्यासाठी जवळपास पाच दिवस लागले असून, आतापर्यंत एकूण 285 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
 
याशिवाय तितलगडमधील दोन बँकांच्या लॉकरमधूनही मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. हे लॉकर्स मद्य व्यावसायिक संजय साहू यांचे आहेत.
 
स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक भगत बेहरा यांनी ही माहिती दिली आहे.
 
बलांगीर जिल्ह्यातील तितलगड आणि संबलपूर शहरातही आयकर विभागाने छापे टाकले. त्यात 11 कोटी रुपये आणि 37.50 कोटी रुपयांची रोकड सापडली. अशाप्रकारे, ओडिशातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत 333.50 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
 
ओडिशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा 'कॅश हॉल' तर आहेच, पण संपूर्ण देशात आयकर छाप्यात सापडलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचं म्हटलं जातंय.
 
नोटा मोजताना बिघडल्या मशीन
ही सर्व रक्कम सूदपाडा भट्टी आणि व्यवस्थापक बंटी साहू यांच्या शेजारील घरावर छापा टाकून जप्त करण्यात आली. ती 176 पोत्यांमध्ये भरून ठेवली होती. या नोटांमध्ये 500, 200 आणि 100 अशा नोटा होत्या. शिवाय यात अनेक जुन्या नोटा ही होत्या, ज्यावर धूळ जमा झाली होती.
 
यामुळेच स्टेट बँकेचे 50 हून अधिक कर्मचारी 25 काउंटिंग मशीनच्या साहाय्याने रात्रंदिवस नोटांची मोजणी करत होते, तरीही पैसे मोजायला पाच दिवस लागले.
 
नोटा मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, जुन्या नोटांमुळे मशीन अनेक वेळा बिघडल्या, त्यामुळे अनेक बंडल हाताने मोजावे लागले.
 
नोटांवर धुळीचा थर साचल्याने मोजणीदरम्यान कर्मचाऱ्यांनी मास्क घातले होते.
छाप्यात सापडलेल्या रोख रकमेची मोजदाद पूर्ण झाली असली तरी छापेमारी अजून संपलेली नाही.
 
चौकशीदरम्यान सूदपाडा भट्टीचा व्यवस्थापक बंटी आणि अन्य एका कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आजही अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यामुळे आणखी रोकड जप्त होण्याची शक्यता आहे.
 
विशेष म्हणजे आयकर विभागाने ओडिशासह झारखंड आणि पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी छापे मारले होते. मात्र बंगाल आणि झारखंडमधील छाप्यांमध्ये किती रक्कम जप्त करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे सर्व छापे झारखंडचे राज्यसभा सदस्य धीरज कुमार साहू आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांवर टाकण्यात आले आहेत.
 
तीन राज्यांतील 30 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाचे 100 हून अधिक अधिकारी सहभागी होते.
 
साहू कुटुंब आणि मद्य व्यवसाय
एकाच दारूच्या भट्टीतून एवढी मोठी रक्कम जप्त केल्याने ओडिशातील जनतेला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असणार. मात्र राज्यातील देशी दारूचा व्यापार आणि धीरज साहू यांच्या कुटुंबाचं जुनं नातं आहे.
 
जाणकारांच्या मते, स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच 90 वर्षांपूर्वी लोहरदगाचे व्यापारी रायसाहेब बलदेव साहू (धीरज साहू यांचे वडील)
 
यांचे बलांगीर राज्याच्या तत्कालीन राजाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. तेव्हापासून हा व्यवसाय सुरू झाला.
 
राजाने त्यांना राज्यात देशी दारूची दुकानं उघडण्याची परवानगी दिली. राजघराण्याने दिलेल्या परवानगीमुळे साहू कुटुंबाने एकापाठोपाठ एक भट्ट्या सुरू करून आपला व्यवसाय वाढवला.
 
आज परिस्थिती अशी आहे की, जिल्ह्यातील 62 पैकी 46 भट्ट्या या साहू कुटुंबाच्या मालकीच्या आहेत. स्वातंत्र्यानंतरही त्यांचा हा व्यवसाय कायम राहिला. साहू कुटुंबाचे दारूचे साम्राज्य बलांगिरपासून पश्चिम ओडिशाच्या इतर भागात विस्तारले आहे.
कालाहंडी, नुआपाडा, संबलपूर, सुंदरगढ यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्ये देशी दारूच्या व्यवसायाचा मोठा भाग हळूहळू साहू कुटुंबाच्या ताब्यात आला.
 
काळाच्या ओघात बलदेव साहू अँड सन्सने देशी दारूबरोबरच विदेशी दारूच्या व्यवसायातही पाय रोवायला सुरुवात केली.
 
त्यासाठी त्यांनी 'बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड' (बीडीपीएल) या सहयोगी कंपनीची स्थापना केली.
 
राज्यातील इंग्लिश मद्य व्यवसायाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी राज्यातील 18 भारतीय बनावटीच्या विदेशी दारू (आय एम एफ एल) बॉटलिंग प्लांटला दारू बनवण्यासाठी लागणारे 80 टक्के स्पिरीट पुरवते.
 
केवळ ओडिशातच नाही तर बंगाल आणि झारखंडसह पूर्व भारतातील बहुतेक बॉटलिंग प्लांटला बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कडून स्पिरिट पुरवले जाते.
 
स्पिरिटचा पुरवठा करण्याव्यतिरिक्त ही कंपनी 'एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल' किंवा ईएनए देखील तयार करते, ज्याचा वापर व्हिस्की, वोडका, जिन सारखे विदेशी मद्य तयार करण्यासाठी केला जातो. तसेच पेंट, शाई आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो.
 
साहू कुटुंबातील सदस्य इतर दोन कंपन्या देखील चालवतात. यापैकी एक म्हणजे 'किशोर प्रसाद विजय प्रसाद बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड' जी आयएमएफएलच्या अनेक ब्रँडची विक्री आणि वितरण करते. तर दुसरी 'क्वालिटी बॉटलर्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी इंग्लिश मद्याचं बॉटलिंग करते.
 
एवढा पैसा आला कुठून?
बीडीपीएलशी संबंधित एका व्यक्तीने दावा केलाय की, हे सर्व पैसे केवळ दारू व्यवसायाशी संबंधित आहेत.
 
या व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "देशी दारू बनवण्यासाठी मोहाच्या फुलांचा वापर केला जातो. जंगलातून मोह गोळा करणाऱ्या आदिवासींना डिजिटल पेमेंटची माहिती नसते. त्यामुळे त्यांना रोखीनेच पैसे दिले जातात. त्याचप्रमाणे जो व्यक्ती 60 रुपये देऊन देशी दारूची बाटली विकत घेतो तोही रोखीने पैसे देतो.
 
जप्त करण्यात आलेल्या रकमेचा दारू व्यवसायाशी संबंध नाही, असं म्हणणं चुकीचं असल्याचं या व्यक्तीने सांगितलं.
 
या व्यक्तीने केलेल्या दाव्याप्रमाणे, हा व्यवसायच रोख पैशाचा आहे आणि त्यात मोठी रक्कम सापडणं आश्चर्याचं नाही.
 
ही व्यक्ती सांगते, "2019 मध्येही साहू कुटुंबियांच्या व्यवसायावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी सुमारे 35 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. पण नंतर या रोख रकमेचा स्रोत आणि हिशोब दिल्यानंतर प्राप्तिकर विभागान पैसे परत केले होते."
 
मात्र, साहू कुटुंबाने मद्याचं एवढं मोठं साम्राज्य चालवलं असूनही, जप्त केलेली सारी रोकड दारू व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचीच आहे यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही.
 
बलांगीरमधील देशी दारूच्या व्यवसायावर बारकाईने नजर ठेवणाऱ्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "देशी दारू पिणाऱ्या व्यक्तीकडे फक्त 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा असतात. पण इथे जप्त केलेल्या नोटांमध्ये 500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक आहेत. साहजिकच हा काळा पैसा होता जो आगामी निवडणुकीत वापरला जाणार होता.
 
त्यांनी पुढे सांगितलं की, "साहू ब्रदर्स कंपनी केवळ सर्व पक्षांना आणि स्थानिक प्राधिकरणांच्या प्रतिनिधींना देणगी देत नाही, तर पूजा, खेळ किंवा इतर सामूहिक कार्यक्रमांसारख्या प्रत्येक सामूहिक कामात खुलेपणाने पैसे खर्च करते. त्यामुळे सर्व काही माहीत असूनही, याबाबत आजपर्यंत कोणीही तोंड उघडलेलं नाही. तुम्ही याला कंपनीची 'सीएसआर पॉलिसी' म्हणू शकता.
 
लोहरदगा आणि रांची येथून मिळालेल्या माहितीनुसार, साहू कुटुंबाने येथील सामूहिक कामासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत.
 
भाजपने केली ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी
भाजपच्या झारखंड युनिटचे प्रवक्ते प्रतुल शाह देव यांनी जप्त केलेली संपत्ती काळा पैसा असल्याचा दावा केला आहे.
 
त्यांनी बीबीसीला फोनवरून माहिती देताना सांगितलं की, "त्यांच्या कंपनीच्या ताळेबंदानुसार, त्यांच्या संपूर्ण व्यवसायाची वार्षिक उलाढाल 120 कोटी रुपये आहे. मग एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडून वसूल कशी झाली?"
 
धीरज साहू यांचे मोठे बंधू गोपाल हे अनेक वर्षांपासून झारखंड काँग्रेसचे कोषाध्यक्ष आहेत. पण आम्हाला असं वाटतं की धीरज हे संपूर्ण काँग्रेस पक्षाचे अनौपचारिक खजिनदार आहेत. जप्त केलेली रक्कम ही काँग्रेसच्या काळ्या पैशाचा एक छोटासा भाग आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. या संपत्तीचे धागेदोरे काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचतात की नाही हे शोधून काढले पाहिजे.
 
तर काँग्रेसने म्हटलंय की त्यांचा धीरज साहू यांच्या व्यवसायाशी कोणताही संबंध नाही.
 
पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर सांगितलं की, "फक्त तेच सांगू शकतात आणि त्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे. आयकर अधिकार्‍यांनी एवढी मोठी रोकड कशी जप्त केली आहे, हेही स्पष्ट केलं पाहिजे."
 
या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त झाल्यानंतर भाजप आक्रमक होताना दिसते. तर काँग्रेस आपला बचाव करताना दिसून येत आहे. कारण काँग्रेसचे आणि साहू कुटुंबाचे संबंध खूप जुने आणि जगजाहीर आहेत.
 
साहू कुटुंब आणि काँग्रेसचे संबंध
दारुच्या व्यवसायात उतरलेले कुटुंबातील पहिले व्यक्ती रायसाहेब बलदेव साहू हे काँग्रेसचे कट्टर समर्थक होते.
 
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी साहू कुटुंबाचं आदरातिथ्य स्वीकारलं आहे.
 
लोहरदगा येथील जुने रहिवासी सांगतात की, 1958 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद आले असताना त्यांना बलदेव साहू यांच्या कारमधून नेण्यात आलं. त्यावेळी संपूर्ण भागात एकमेव गाडी होती.
 
त्याचप्रमाणे, 1984 मध्ये इंदिरा गांधी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी रांची येथील मेसरा येथे आल्या होत्या. त्यावेळी त्या शहरातील रेडियम रोडवर असलेल्या साहू ब्रदर्स (सुशीला निकेतन) या आलिशान बंगल्यात राहिल्या होत्या.
 
धीरज यांचे मोठे बंधू शिवप्रसाद साहू (दिवंगत) हे काँग्रेसचे प्रभावशाली नेते आणि रांचीचे दोन वेळा खासदार होते.
सहा भावांमध्ये सर्वात लहान असलेले धीरज सध्या तिसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य आहेत.
 
विशेष म्हणजे 2018 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती 34.83 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते.
 
यामध्ये स्थावर मालमत्ता ही 2.04 कोटी रुपयांची दाखवली होती.
 
प्रतिज्ञापत्रात त्यांनी रोख रक्कम म्हणून केवळ 27 लाख रुपयांचा उल्लेख केला होता.
 
त्यामुळे त्यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या कंपन्यांमधून शेकडो कोटींची रोकड सापडल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तपास यंत्रणांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रश्नांची उत्तरे मिळतील.


Published By- Priya Dixit