शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: पुणे , बुधवार, 14 मे 2014 (10:38 IST)

चार दिवसांत मान्सून दक्षिण अंदमानात!

येत्या चार दिवसांत म्हणजेच 17 मेपर्यंत मन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोचण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.  नैऋत्य मोसमी वारे देशात दाखल होण्यास अनुकूल हवामान निर्माण झाले आहे. यंदा तीन दिवस अगोदरच मान्सून देशात व राज्यात सर्वसाधारण वेळेत पोचण्याची शक्‍यता आहे. दरम्यान 20 मे दरम्यान मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल होतो.

देशात मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये आणि त्यानंतर कोकणात दाखल होतो. 11 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून उत्तरेच्या प्रवासाला निघतो. सर्वांत शेवटी 15 जुलैपर्यंत तो पश्‍चिम राजस्थानसह संपूर्ण देश व्यापतो. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा समाधानकारक मान्सून राहणार असल्याचा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पश्‍चिम बंगालपासून झारखंड, सिक्कीम व ओडिशापर्यंतच्या भागात हवेच्या खालच्या थरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुरुवारी सकाळपर्यंत या पट्ट्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. दक्षिण छत्तीसगडपासून तेलंगण, तमिळनाडू ते कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याची तीव्रताही गुरुवारी सकाळपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. या सर्व हवामान स्थितीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस सुरू होईल, असा अंदाज आहे.