बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (21:01 IST)

प्रमोशन न मिळाल्यास...

प्रत्येक कंपनी, संस्था ही दरवर्षी कर्मचार्‍याच्या कामांचेमूल्यमापन करून त्यानुसार वेतनवाढ, बढती, अवमूल्यन यासारख्या निर्णयांची अंमलबजावणी करत असते. मूल्यमापन अहवालातून प्रत्येक कर्मचारी समाधानी राहिलच याची खात्री देता येत नाही. काहींना कमी तर काहींना जास्त गुण मिळतात. यावरूनही कर्मचार्‍यात मतभेद निर्माण होतात आणि बॉसविषयी समज-गैरसमज होऊ लागतात. काही कर्मचारी चांगले काम करूनही त्यांना समाधानकारक वाढ दिली जात नसेल, तर त्यांच्या मनात नकारात्मकता वाढू लागते.
 
असा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. जर यंदाच्या मूल्यमापन अहवालात आपल्याला कमी गुण मिळाले असतील तर आपल्याला हताश होण्याची गरज नाही. आपण जर चांगले काम करत असू आणि त्या तुलनेत कमी गुण दिले जात असतील तर काही बाबींची आपण तपासणी करायला हवी.
 
स्वतःला पडताळून पाहाः सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला पडताळून पाहणे होय. आपण तठस्थपणे आपल्या कामगिरीचे मूल्यमापन करायला हवे. खरंच आपल्या कामगिरीत काही उणिवा राहिल्यात का याचा विचार करायला हवा. स्वतःला काही प्रश्न विचारा. आत्मपरीक्षण करून आपण खरोखरच प्रामाणिकपणे सर्व कामे वेळेवर, अचूक आणि दर्जेदारपणे पार पाडत आहोत का, याचे आकलन करावे. प्रत्येकपातळीवर स्वतःला पडताळून पाहा. अशी कृती केल्यावरच वरिष्ठ आणि आपण यांच्यात प्रामाणिक कोण आहे, हे कळून चुकेल. जर आपण खरोखरच प्रामाणिक आहोत आणि कसोटीला उतरलेलो असू तर आपले म्हणणे वरिष्ठांसमोर मांडायला हवे. यानिमित्ताने आपण वरिष्ठांना आपल्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत, याचे आकलन होईल. वरिष्ठ आपल्याबाबत काय विचार करतात, याबाबत सजग असावे. वरिष्ठ किंवा बॉसशी चर्चा केल्यानंतर आपल्याला मिळालेल्या कमी गुणांचे कारण समजू शकेल.
 
मनमोकळेपणाने म्हणणे मांडाः जर आपण स्वतः अहवालापासून पळ काढत असेल तर हा चुकीचा अप्रोच आहे. उलट तुम्ही तितक्याच ताकदीने आव्हानांचा मुकाबला करण्याची गरज आहे. यासंदर्भात आणि वरिष्ठ सहकार्‍यांशी किंवा मेटाँरशी चर्चा करायला हवी. कमी गुण मिळाले म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याकडून खूप चुका होत आहेत. त्या अहवालास गृहीत धरू नका. त्यातून चुका होण्याची शक्यता असते. यासाठी आपण कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अहवालाला घाबरण्याऐवजी सकारात्मक दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. जर आपल्या परफॉर्मन्स असेसमेंटमध्ये खरोखरच मोठी चूक झाली असेल तर आपले म्हणणेमोकळेपणाने मांडायला हवे.
 
उगाचच भीती नकोः कामात आपल्याकडून काही गडबड झाल्याची भीती वाटत असेल आणि आपण याबाबत काहीच करू शकत नसाल तर एक बाब लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे आगामी वर्षासाठी एक ध्येय निश्चित करायला हवे. ते ध्येय गाठण्यासाठी सक्रियपणे त्यात स्वतःला झोकून ायला हवे. वेळोवेळी आपल्या वरिष्ठांना, बॉसना आपल्या कामगिरीची माहिती देत राहावी. जर आपल्या सहकार्‍यांना, वरिष्ठांना आणि बॉसना आपण केलेल्या कामाची सतत माहिती देत राहिलो तर ऐनवेळी मूल्यमापन अहवालात कमी गुण मिळण्याचा धा बसणार नाही. कामगिरी आणि मूल्यमापन अहवालात यात जर विसंगती राहत असेल तर त्या बाबीला न भीता पुढचा विचार करायला हवा. जर आपण स्वतःला कमी लेखू लागलो तर निराशाच पदरी पडेल, हे लक्षात ठेवावे.

 - सुभाष वैद्य