शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (08:20 IST)

पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट बुकी ताब्यात, 1 कोटी जप्त

पुणे शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई  करत दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रूपयांवर अधिकची रोकड जप्त केली आहे.या कारवाई दरम्यान, सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
 
गणेश भुतडा हा देशातील एक बडा क्रिकेट बुकी म्हणून ओळखला जातो अशी माहिती समोर आली आहे तर अशोक देहुरोडकर हा देखील महाराष्ट्रातील खुप मोठा बुकी आहे.समर्थ आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुण्यात मोठया प्रमाणावर आयपीएल क्रिकेट सामन्यांवर क्रिकेट बेटींग सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. सुरू असलेल्या क्रिकेट बेटींगवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिले होते.
 
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे , गुन्हे शाखेच्या प्रभारी अप्पर आयुक्त भाग्यश्री नवटके, झोन -1 च्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे,गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने  तसेच इतर वेगवेगळया पथकांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी केली.पोलिसांनी गणेश भुतडा आणि अशोक देहुरोडकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रूपयांची रोकड जप्त केली आहे.गणेश भुतडा आणि देहुरोडकर यांच्याकडील डायर्‍या,मोबाईल आणि इतर काही ‘कागदे’ पोलिसांनी जप्त केली आहेत.त्यामध्ये अनेकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.