मार्च 2022 पासून महिला पुणे एनडीएची प्रवेश परीक्षा देऊ शकतात – केंद्र सरकार
महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे अर्थात एनडीएमध्ये (NDA) प्रवेश देण्याबाबत तयारी सुरू झाली आहे. मार्च 2022 पर्यंत महिला NDA प्रवेश परिक्षा देऊ शकतात, त्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रियाही तोपर्यंत पूर्ण होईल असे केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
एनडीए ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. आणि 2022 च्या वर्षाचं वेळापत्रक यूपीएससीनं जाहीर करताना याबाबतची तयारी झालेली असेल असं केंद्रानं म्हटलं आहे. अर्थात या पहिल्या बॅचमध्ये किती महिलांना संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 18 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टानं यासंदर्भात दिलेल्या एका निकालानंतर महिलांना एनडीएचे दरवाजे खुले झाले होते. एनडीएमध्ये महिलांना प्रवेश नाकारणं ही लिंगभेद करणारी गोष्ट आहे असं सांगत कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं तयारीसाठी किमान या वर्षाची सवलत मिळावी अशी विनंती केली होती.
केंद्र सरकारला याबाबत काय तयारी आहे हे सांगण्यासाठी 20 सप्टेंबरचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार केंद्रानं ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही लष्करी प्रशिक्षण देणारी देशातली सर्वोच्च संस्था आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांमध्ये देशातले सर्वोच्च अधिकारी या अकादमीतून तयार होतात.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच 2023 पासून सुरु होऊ शकते. आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याबाबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारनं ही बाब स्पष्ट केली आहे. 2022 म्हणजे पुढच्या वर्षी मे पर्यंत एनडीएच्या प्रवेश परीक्षेत महिलांनाही संधी देणारी सर्व प्रक्रिया पूर्ण होईल असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.