शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (08:08 IST)

पुणे-मुंबई दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार

पुणे-मुंबई दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. जुहू-पुणे-जुहू आणि महालक्ष्मी रेसकोर्स-पुणे-महालक्ष्मी रेसकोर्स या मार्गावर ही सेवा सुरू होणार आहे.
 
मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रोपॉलिटन शहरात ही सेवा सुरू केल्याने आपत्तीच्या काळात या सेवेचा नागरिकांना फायदा होणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका तसेच दुर्घटनेच्या वेळी तात्काळ उपचार मिळण्यासाठी ही हेलिकॉप्टर सेवा फायदेशीर ठरणार आहे. मुंबई मधील जुहू येथे हेलिकॉप्टर हब बनविण्याची सरकारची योजना आहे. मोठ्या शहरांना जवळच्या लहान शहरांशी जोडणे हा उद्देश ही हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यामागे आहे.अहमदाबाद-गांधीनगर, दिल्ली आणि अन्य मोठ्या शहरांना जोडण्याची देखील योजना हवाई वाहतूक मंत्रालयाची आहे. देशातील 10 शहरांमध्ये 82 मार्गांवर अशा प्रकारची हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाणार आहे.
 
डेहराडून येथे बोलताना हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही घोषणा केली आहे. जुहू-पुणे-जुहू, महालक्ष्मी रेसकोर्स-पुणे-महालक्ष्मी रेसकोर्स, गांधीनगर-अहमदाबाद-गांधीनगर या तीन मार्गावर हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाणार आहे. देशात चार हेलिकॉप्टर हब बनवले जाणार आहेत. त्यातील पहिले मुंबई मधील जुहू, गुवाहाटी, दिल्ली आणि बेंगलोर येथील हाल विमानतळावर हे हब बनविण्यात येणार असल्याचे मंत्री सिंधिया यांनी सांगितले.