शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (22:42 IST)

पुणे : फीट आल्यानं एसटीचा ड्रायव्हर खाली कोसळला, तेव्हा योगिता यांनी घेतलं स्टेअरिंग हाती...

पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
काही महिलांचा ग्रुप शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली इथं फिरायला गेला होता. दिवसभर फेरफटका मारून ही मंडळी परत येत होती.
पण, त्यावेळी बस चालकाच्या डोळ्यासमोर अचानक अंधारी आली आणि त्याला काहीही दिसेनासं झालं.
चालकाची ही अवस्था पाहून बसमध्ये असलेल्या 20 हून अधिक महिला घाबरल्या. त्याचवेळी या महिलांपैकी एक असलेल्या योगिता सातव यांनी प्रसंगावधान दाखवत बसचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं.
या घटनेविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, "चालकाच्या तोंडून स्पष्ट उच्चार येत नव्हते. त्याला सांगितलं की थोडावेळ आराम करा. पण आमचं हे बोलणं सुरू असतानाच त्याचे डोळे पुन्हा पांढरे झाले. हातपाय वाकडे झाले आणि तो जागेवरच फीट येऊन पडला.
"त्यावेळी तो इतक्या मोठ्यानं ओरडला की, ते बघून बसमधील सगळ्या महिला आणि मुलं घाबरले. महिला, मुलं रडायला लागले. अशापरिस्थितीत दुसरा कुणी पुरुषही आमच्याबरोबर नव्हता. मग मीच स्टेअरिंग हातात घ्यायचं ठरवलं."
योगिता यांना चारचाकी गाडी चालवायची सवय आहे. पण, त्यांनी याआधी कधीही बस चालवली नव्हती.
त्या सांगतात, "मी याआधी कधी बस चालवली नव्हती. पण तरी डेरिंग केली. माझ्या मैत्रिणींनी मला विश्वास दिला आणि मग मी गाडी चालवायला लागले. मला जे येतं त्याचा उपयोग करायचा मी ठरवलं."
 
त्यानंतर मग योगिता यांनी गाडी चालवत चालकाला दवाखान्यात दाखल केलं आणि मग मैत्रिणींना, तसंच त्यांच्या लहान मुलांना सुखरूप घरी पोहोचवलं.
फीट येणे हे मी फक्त ऐकून येते, पण त्यादिवशी पहिल्यांदा तो प्रकार बघितल्याचंही योगिता यांनी सांगितलं.
 
सोशल मीडियावर कौतुक
योगिता यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे अनेकांचा जीव वाचला. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
सुकन्या हटणकर यांनी फेसबुकवरील प्रतिक्रियेत म्हटलंय, "एखादी महिला प्रसंगाच्या वेळी कोणती शक्ती आणि युक्ती बाहेर काढू शकते, याचं तुम्ही उत्तम उदाहरण आहात."
दीप्ती सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलंय, "अतिशय खंबीरपणे परिस्थिती हाताळून ड्रायव्हरचे प्राण वाचवले आणि सगळ्यांना सुखरूप घरी पोहोचवले. तुमचं खूप कौतुक."
राम देशमुख यांनी लिहिलंय, "एक भारतीय स्त्री काय करू शकते हे तुम्ही दाखवून दिलं. ताई तुमचा अभिमान वाटतो."
मनिषा भावर यांनी लिहिलंय, "महिला कुठेच कमी नाही ते तुम्ही दाखवून दिले."
तर, "खूप मोठी घटना घडली असती. पण, ताई तुम्ही हिम्मत दाखवत ती टाळली. तुम्हाला सलाम," असं शिवा खेवारा यांनी लिहिलंय.