शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. पंजाब विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (17:09 IST)

भगवंत मान– ‘दारूच्या आहारी गेलेले नेते’ ते पंजाबचे भावी मुख्यमंत्री

पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं पंजाबमध्ये मुसंडी मारली आहे. त्यामुळे त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षातील जुने आणि विश्वासू नेते भगवंत मान यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
भगवंत मान यांना लोक कॉमेडियन आणि नेते म्हणून ओळखतात. पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा ते आम आदमी पार्टीचे खासदार बनले आहेत. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत.
 
2014 मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यापासूनच भगवंत मान पक्षाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. संपूर्ण पंजाबमध्ये प्रभाव असलेले 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ते पक्षाचे एकमेव नेते आहेत. आम आदमी पार्टीची सर्वांत मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमकुवत बाजू म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.
 
भगवंत मान यांच्या राजकीय, कला आणि खासगी जीवनातील काही क्षण.
 
भगवंत मान यांचे काही रंजक किस्से
आम आदमी पार्टीचे पंजाबमधील सल्लागार आणि माजी पत्रकार मंजित सिंग सिद्धू हे भगवंत मान यांचे वर्गमित्र आहेत. त्यांच्या मते, भगवंत मान यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वांत मोठा सकारात्मक पैलू म्हणजे स्वतःची बाजू मांडण्याची त्यांची ऊर्जा. ते ज्या उत्साहाने हजारो लोकांना संबोधित करतात त्याच पद्धतीनं ते दोन-चार लोकांशीही बोलत असतात.
 
टेलिफोन नंबर तोंडपाठ ठेवणं हेदेखिल त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या शेकडो जुन्या मित्रांचे नंबर त्यांना तोंडपाठ आहेत.
 
मंजित सिद्धू यांच्या मते, बहुतांश लोक भगवंत मान यांना कॉमेडियन आणि नेते म्हणूनच ओळखतात. पण ते अत्यंत चांगले कवीदेखील आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे.
 
मात्र, अद्याप त्यांनी त्यांच्या कवितेचं एकही पुस्तक प्रकाशित केलं नसल्याचंही ते सांगतात.
 
भगवंत मान यांना क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे. त्यांना एनबीए, क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल मॅच पाहायला आवडतं. ते जगभरातील खेळाडूंना फॉलो करतात. तसंच त्यांच्याबाबत त्यांना भरपूर माहितीही असते. कधी-कधी रात्री अलार्म लावून झोपतात आणि रात्री 2-3 वाजता उठून ते मॅच पाहतात.
 
भगवंत मान यांनी जवळपास सर्व वर्गमित्र आणि इतर मित्रांना विमान प्रवास घडवला आहे.
 
मंजित सिद्धू सांगतात की, ते जेव्हाही पंजाबच्या बाहेर शो करण्यासाठी जातात, तेव्हा एखाद्या मित्राला सोबत फिरण्यासाठी घेऊन जातात. मोबाईल नंबर तोंडपाठ असणं, हाही त्यांचा एक खास गुण आहे.
 
वृत्तपत्र आणि रेडिओबाबतही त्यांना खास आकर्षण आहे. ते सकाळी उठून वृत्तपत्रांच्या जिल्हा आवृत्त्याही पाहतात. त्यामुळं राज्याच्या प्रत्येक कोपऱ्याबाबत त्यांना माहिती मिळते, असं ते याबाबत बोलताना सांगतात. रेडिओवर मॅचची कॉमेंट्री ऐकणं ही त्यांची लहानपणापासूनची सवय आहे आणि त्यांनी आजपर्यंत ती सोडलेली नाही.
 
कॉमेडीमध्ये पहिलं पाऊल
भगवंत मान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1973 ला पंजाबच्या संगरूर जिल्ह्याच्या शिमा मंडीच्या जवळ असलेल्या सतोज या गावी झाला होता. त्यांचे वडील महिंदर सिंग सरकारी शिक्षक होते आणि आणि आई हरपालकौर गृहिणी आहे.
 
पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर भगवंत मान कॉमेडीच्या क्षेत्रात आले. संगरुरच्या सुनाम शहीद उधम सिंह कॉलेजमध्ये शिक्षण घेताना त्यांनी कॉमेडी आणि कवितेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या. तसंच ते व्यावसायिक कॉमेडियनही बनले.
 
त्यांची पहिली कॉमेडी आणि गाण्यांची पॅरडीची कॅसेट 1992 मध्ये 'गोबी दी ए कच्चिए व्यापारने' ही होती. त्यानंतर कॉमेडीच्या जगात त्यांचं नाव होत गेलं.
 
भगवंत मान यांनी 1994 ते 2015 पर्यंत 13 पंजाबी आणि हिंदी चित्रपटांसह जाहिरातींमध्ये काम केलं.
 
बारावीनंतर त्यांनी बीकॉमसाठी प्रवेश घेतला होता. पण कॉमेडीच्या कामांमध्ये व्यग्र असल्यानं त्यांनी शिक्षण मध्येच सोडलं. 1992 ते 2013 पर्यंत त्यांनी 25 कॉमेडी अल्बम रेकॉर्ड केले. त्यांनी पाच गाण्यांच्या कॅसेटही काढल्या. भगवंत मान यांनी 1994 ते 2015 पर्यंत 13 हिंदी चित्रपट आणि जाहिरातीही केल्या आहेत.
 
'जुगनू', 'झंडा सिंह', 'बीबो बुआ', 'पप्पू पास' अशी विनोदी पात्रं ही भगवंत मान यांनी दिलेली आहेत. जगतार जग्गी आणि राणा रणबीर यांच्याबरोबर कॉमेडी केलेल्या भगवंत मान यांनी 'जुगनू मस्त मस्त' सारखे कॉमेडी टीव्ही शो आणि 'नो लाइफ विथ वाइफ' सारखे स्टेज शो केले आहेत.
 
भगवंत मान यांनीच गायक करमजित अनमोल यांना कॉमेडी शोबरोबर जोडून घेत, अभिनयाच्या क्षेत्रात आणलं होतं.
 
करमजीत अनमोल त्यांचे कॉलेजपासूनचे मित्र असून पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे.
 
भगवंत यांनी इंद्रजित कौर यांच्याबरोबर लग्न केलं. त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची पत्नी अमेरिकेत त्यांच्यापासून वेगळी राहते. तर भगवंत मान आईबरोबर सतोज गावी राहतात.
 
त्यांची एक बहीण मनप्रीत कौर हिचा विवाह जवळच्याच एका गावात झाला आहे.
 
राजकारणात आणणारी घटना
भगवंत मान यांना लहनापणापासूनच भाषण देण्याची सवय होती. त्यावेळी कॉमेडीयन बनतील की नेते बनतील हेही त्यांना माहिती नव्हतं. भगवंत मान शेतात पाणी देताना किंवा लाकूड कापताना दांडा हातात घ्यायचे आणि त्याचाच माईक तयार करून भाषण करत असायचे, असं मनजित सिद्धू सांगतात.
 
कॉमेडी ऑडियो कॅसेट्सच्या माध्यमातून राजकारण आणि समाजातील इतर मुद्द्यावर व्यंग्य करणं हे त्यांच्या कलेचं केंद्र होतं, असं सिद्धू सांगतात.
 
2009-2010 मध्ये त्यांनी वृत्तपत्रामध्ये नियमितपणे स्तंभलेखन सुरू केलं. त्यादरम्यान त्यांनी फाजिल्का परिसरात मुलींना एका विचित्र आजारानं घेरल्याची बातमी वाचली.
 
भगवंत मान दुसऱ्याच दिवशी नानक आणि जवळच्या दोन गावांमध्ये पोहोचले होते. त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या होती. त्यामुळं लोकांची अवस्था गंभीर झाली होती. काही मित्रांच्या मदतीनं भगवंत मान यांनी या भागात पाण्याचा एक ट्यूबवेल लावत शक्य तशी मदत करण्याचा प्रयत्न केला होता.
 
त्यांनी काही सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातील लोकांच्या मदतीनं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला. 2011 मध्ये प्रकाश सिंह बादल यांचे पुतणे आणि तत्कालीन अर्थमंत्री मनप्रित सिंग बादल यांनी अकाली दलबरोबर बंडखोरी केली होती.
 
प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ सरदार सिंग जोहल यांच्या नेतृत्वात जालंधरमध्ये पंजाबच्या मुद्द्यांबाबत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी भगवंत मान आणि मनप्रीत बादल यांची भेट झाली आणि त्यांनी भगवंत मान यांना सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रेरणा दिली.
 
राजकीय प्रवास
"मी कॉमेडीच्या माध्यमातून एकप्रकारे राजकीय आणि सामाजिक भूमिका मांडतच असतो. आता मला वाटतं की, चिखल स्वच्छ करायचा असेल तर त्यात उतरावंच लागणार आहे. त्यामुळं मी सक्रिय राजकारणात आलो आहे," असं भगवंत मान यांनी राजकारणात पाऊल ठेवताना म्हटलं होतं.
 
"अकाली दल आणि काँग्रेसनं मिळून सत्तेचं चक्र तयार केलं आहे. पंजाबचे लोक यामध्ये भरडले जात आहेत. त्यामुळं पंजाबला एक पर्याय देणं गरजेचं आहे. तो पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू," असं ते म्हणाले होते.
 
भगवंत मान व्यावसायिक कलाकार म्हणून अनेक राजकीय मंचावर जात होते. पण त्यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता. विशेषतः भगवंत मान यांनी तिसरा पर्याय म्हणून बलवंत सिंह रामुवालिया यांच्या लोक भलाई पक्षाच्या विकासासाठी अनेक पावलं उचलली. पण ते कधीच कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी झाले नव्हते. कॉलेजच्या दिवसांपासून डाव्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पण ते कोणत्याही पक्षाचे सदस्य बनले नाहीत.
 
मनप्रीत बादल यांनी मार्च 2011 मध्ये पंजाबमध्ये पिपल्स पार्टीची स्थापना केली, तेव्हा भगवंत मानही राजकारणात उतरले आणि पीपीपीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक ठरले.
 
दिग्गजांकडून हरले आणि हरवलेही
फेब्रुवारी 2012 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांनी लहरागागा मतदार संघातून पीपीपीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. भगवंत मान पंजाबच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्या राजिंदर कौर भट्टल यांच्या विरोधात पराभूत झाले.
 
2012 च्या विधानसभा निवडणुकीत पीपीपीला एकही जागा मिळाली नाही. अकाली दलनं सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्यानंतर मनप्रित सिंग बादल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर भगवंत मान यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याऐवजी वेगळा मार्ग निवडला आणि 2014 मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला.
 
अण्णा हजारेंच्या आंदोलनातून निर्माण झालेल्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं चार जागा जिंकल्या.
 
भगवंत मान या निवडणुकीमध्ये पक्षाच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा होते. त्यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि अकाली दलचे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंह ढिंडसा यांना 2,11,721 मतांच्या मोठ्या फरकानं पराभूत केलं.
 
या निवडणुकीत काँग्रेसचे नेते विजय इंदर सिंगला हे तिसऱ्या स्थानी होते.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत परिस्थिती बदललेली होती. 2017 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं पुन्हा सत्ता मिळवली होती.
 
त्यावेळी आम आदमी पार्टीमध्येही फूट पडली होती. सुखपाल खैरा यांच्या पंजाब एकता पार्टी आणि धर्मवीर गांधी यांच्या न्यू पंजाब पार्टीनं तसंच बैंस भावंडांच्या लोक इन्साफ पार्टीनं आघाडी केली. मात्र, त्या आघाडीला एकही जागा मिळू शकली नाही.
 
8 मे 2017 ला भगवंत मान यांना आम आदमी पार्टी पंजाबचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं. पण त्यांनी काही काळातच राजीनामा दिला. अरविंद केजरीवाल यांनी ड्रग माफियांना तथाकथित संरक्षण देण्यासाठी अकाली नेते बिक्रम सिंह मजीठिया यांच्या विरोधात अब्रू नुकसानीच्या प्रकरणात न्यायालयात माफी मागितली, त्यामुळं ते नाराज होते.
 
2017 च्या निवडणुकीत भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीच्या तिकिटावर जलालाबादमधून सुखबीर बादल यांच्या विरोधात लढा दिला. पण ते 18500 मतांनी पराभूत झाले.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भगवंत मान यांनी 1,11,111 मतांनी पुन्हा निवडणूक जिंकली.
 
दारुवरुन वाद
राजनेत्यांवर अनेकदा भ्रष्टाचार, वंशवाद आणि संपत्ती जमवण्याचा आरोप केला जातो.
 
पण जवळपास एका दशकाच्या राजकीय करिअरमध्ये भगवंत मान यांच्यावर लागलेला सर्वांत मोठा आरोप म्हणजे ते दारु पित असल्याचा आरोप.
 
आपचे बंडखोर नेते योगेंद्र यादव यांनी 2015 मध्ये असं वक्तव्य केलं होतं की, जुलै 2014 मध्ये खासदारांची एक बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी भगवंत मान माझ्या जवळ बसलेले होते, तेव्हा दारुचा वास येत होता.
 
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही नंतर माध्यमांमध्ये भगवंत मान यांच्यावर दारुचं व्यसन असल्याचा आरोप केला होता.
 
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या आरोपांच्या काही दिवसांनंतर आपचे बंडखोर नेते हरिंदर सिंह खालसा यांनी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे जागा बदलण्याची लेखी विनंती केली होती. भगवंत मान यांच्यामुळे दारुचा वास येत असल्याचं कारण त्यांनी दिलं होतं.
 
संसदेत त्यांच्या भाषणांदरम्यान अनेकदा सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी त्यांच्यावर दारुच्या नशेमध्ये संसदेत आल्याचा आरोप केला आहे.
 
एकदा भगवंत मान संसदेत एका चर्चेदरम्यान बोलत होते, त्यावेळी भाजपचे एक खासदार जवळ येऊन वास घेत होते, त्याचा व्हीडिओदेखील व्हायरल झाला होता.
 
तसं तर अनेक नेते दारुचं सेवन करतात मात्र भगवंत मान यांच्यावर दिवसाही दारुच्या नशेत असल्याचा आरोप झाला होता. गुरु ग्रंथसाहीब अवमान प्रकरणी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान 2015 मध्ये फायरिंगमध्ये मारल्या गेलेल्या तरुणांच्या आंदोलनाच्या वेळीही त्यांच्यावर दारु प्यायल्याचा आरोप झाला होता.
 
इव्हेंटदरम्यान स्टेजवरून निघाल्याचा त्यांचा व्हीडिओदेखील व्हायरल होत होता. त्यात त्यांच्यावर दारु प्यायल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
पण, ते मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही. हे सर्व आरोप मला बदनाम करण्यासाठी केले जात आहे, असं म्हणत कारमधून बसून जाताना दिसतात.
 
नोव्हेंबर 2016 मध्ये गायक मनमित अलिशेर यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या अंत्यसंस्कारातही दारु सेवन करून आल्याचा आरोप भगवंत मान यांच्यावर झाला होता.
 
भगवंत मान आणि त्यांच्या समर्थकांनी दारुचं प्रकरण म्हणजे अकाली-भाजपा आणि काँग्रेसकडून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
 
पंजाबमध्येही भगवंत मान यांचे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचे व्हीडिओ ते दारुच्या नशेत असल्याचं सांगत व्हायरल झाले आहेत. मात्र, हा कारस्थानाचा भाग असल्याचा दावा मान आणि त्यांच्या समर्थकांकडून वारंवार करण्यात आला आहे.
 
20 जानेवारी, 2019 ला भगवंत मान यांनी बरनालामध्ये एका सभेमध्ये त्यांच्या आईच्या उपस्थित शपथ घेतली होती. 1 जानेवारी 2019 पासून दारुला स्पर्श न करण्याची शपथ त्यांनी घेतली होती.