चरणजीत सिंह चन्नी दोन्ही मतदारसंघात पराभूत
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर दोन मतदारसंघांमध्ये पराभवाची नामुष्की ओढवली. चमकौर साहिब आणि भदौर अशा दोन मतदारसंघांमधून चन्नी यांनी निवडणूक लढवली होती.
"पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना हरवणारा एका मोबाईलच्या दुकानात काम करतो. लाभ सिंह त्यांचं नाव. तो मोबाईल रिपेअरिंगचं काम करतो. आम आदमी काय करू शकतो याचं हे उदाहरण. आता आपल्याला देशात क्रांती आणायची आहे," असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
पंजाब राज्यात आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला होता. काँग्रेस पक्षातील अंतर्गत सुंदोपसुंदीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला.
अमरिंदर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र त्यांनी पंजाब पीपल्स काँग्रेस नावाच्या पक्षाची स्थापना केली. काँग्रेस हायकमांडने चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली. चन्नी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले होते.
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही चन्नी आणि सिद्धू यांच्यात बेबनाव होता. दरम्यान सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. सिद्धू यांचा अमृतसर ईस्ट मतदारसंघातून पराभव झाला.
योगायोग म्हणजे याआधीही पंजाबचे मुख्यमंत्री राहिलले नेते या निवडणुकीत जिंकू शकलेले नाहीत. चन्नी यांच्या आधीचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
58 वर्षीय चन्नी दलित शीख समाजातले नेते आहेत. अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते तंत्रशिक्षण मंत्री होते.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षानंही बहुमताचा आकडा ओलांडला आहे. या क्रांतीसाठी पंजाबच्या जनतेचे आभारी आहोत, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.