फेडरल बँक करणार नोकर भरती
जागतिक आर्थिक मंदीचे सावट वाढत असतानाच अनेक बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे असताना फेडरल बँक लिमिटेडने मात्र आगामी काळात देशात आपल्या शाखांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शाखांची संख्या वाढवण्यात येणार असल्याने बॅकेने आपल्या कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तीन हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेचे प्रबंध निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम वेणुगोपालन यांनी आज माहिती जाहीर केली. 2011 पर्यंत बँकेचे उत्पन्न एक लाख करोडपर्यंत पोहचवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी बँकांच्या शाखांची संख्या वाढवण्यात येणार असून, कर्मचारी संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.