शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वेबदुनिया|

मंदीची संक्रांत कापड उद्योगावर

७२ टक्के उत्पादन घटले, अनेक गिरण्या बंद

अर्थमंत्री पी. चिदंबरम भारतात अजूनही आर्थिक मंदीची सुरवात झालेली नाही, असे सांगत असले तरी त्यांच्याच गृहराज्यात मात्र या मंदीचे पडसादही उमटू लागले आहेत. तमिळनाडूतील कापड उद्योगातील उत्पादन या मंदीमुळे तब्बल ७२ टक्क्यांनी कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी घटल्याने ही वेळ आली आहे.

राज्यात कापड उद्योगात पन्नास अब्ज रूपयांची गुंतवणूक आहे. पण मंदीमुळे या उद्योगाची अवस्था अतिशय गंभीर आहे. अनेक कापड गिरण्या बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. ब्रिटन व अमेरिकेतील अनेक मोठ्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. धागे उत्पादकांवरही संक्रांत कोसळली आहे. कारण बांगलादेश व मध्यपूर्वेतून येणार्‍या ऑर्डर्स मंदावल्या आहेत.

या सगळ्यामुळे पन्नास टक्के कामगार बेरोजगार झाले आहेत. ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता या उद्योगातील सूत्रांनी सांगितले. हा काळ आतापर्यंतचा सगळ्यात कठीण असल्याची माहिती त्यांनी दिली.

कापड उद्योगांत पाकिस्तान व चीनसह भारत एक महत्त्वाचा देश आहे. पाकिस्तान व चीनने मंदीला तोंड देण्यासाठी उपाय योजले आहेत. पण भारतात मात्र सरकारने काहीही उपाययोजना न केल्याने स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक गिरण्या बंद पडतील आणि कामगार बेकार होतील अशी भीती साऊथ इंडिया स्मॉल स्पिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुंदर राजन यांनी सांगितले.