सिटी बॅंक 'झोपण्याची' शक्यता
सिटी नेव्हर स्लिप असे बोधवाक्य असणारी सिटी बॅंकही आता कायमस्वरूपी झोपण्याच्या तयारीत आहे. जागतिक मंदीच्या विळख्यात आता जगातील मोठ्या बॅंकांपैकी एक असलेली सिटी बॅंकही सापडली असून मंदीने बॅंकेला गिळंकृत करून टाकण्याचे ठरविल्याचे दिसते. कालच बॅंकेच्या शेअर्स २५ टक्के खाली आल्यानंतर आता सिटीग्रुपने स्वतःला विकण्यासाठी चाचपणी सुरू केली असून विलिनीकरणाचा पर्यायही चाचपून पाहिला जात आहे. विक्रम पंडीत या मराठी माणसाने याच वर्षी या बॅंकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली होती. या आठवड्यात बॅंकेचे शेअर्स पन्नास टक्के खाली आले आहेत. त्यामुळेच बॅंकेने आता सध्या तरी विलिनीकरणावर गंभीर विचार करायला सुरवात केली आहे. अर्थात याविषयीची चर्चा अत्यंत गोपनीय असून सोमवारी यासंदर्भात व्यवस्थापन मंडळाची बैठक होणार असून त्यात काही निर्णय होण्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रीट जर्नलला सिटी ग्रुपने केलेल्या खुलाशात सांगितले आहे, की बॅंकेची भांडवल व रोकडस्थिती मजबूत आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी बॅंकेने आता नवी रणनीती अवलंबण्याची योजना बनवली आहे. सौदी अरेबियाचे सुलतान अलवालिद बिन तलाल यांनी बॅंकेतील वाटा पाच टक्क्यांनी वाढविण्याचे ठरविले आहे. ५२ हजार कर्मचारी काढणारआर्थिक अरिष्टामुळे बॅंक जागतिक स्तरावरील आपल्या विस्तारावरही मर्यादा घालणार आहे. त्याचवेळी सध्या असलेले काम वीस टक्क्यांनी कमी केले जाणार आहे. शिवाय ५२ हजार कर्मचार्यांना नारळ दिला जाणार आहे. शेअर्स घसरले दरम्यान, बॅंकेच्या या हालचालींमुळे गुंतवणूकदार हादरले आहेत. त्यामुळे लोकांनी शेअर्स विकण्याचा धडाका लावला. परिणामी बॅंकेच्या शेअर्सचा भाव पाच डॉलरपेक्षा खाली गेला. गेल्या १४ वर्षातील हा नीचांक आहे. बॅंकेची किंमत आता ४८.७ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली आहे. सरकारी मदतीस नकार एवढी गंभीर परिस्थिती असूनही बॅंक सरकारकडून कोणतीही मदत मागण्याच्या 'मूड'मध्ये नाही. काही गुंतवणूकदारांच्या मते सरकारी मदत बॅंकेशी केलेल्या कराराशी निगडीत असेल. तर ती स्वीकारावी. याउलट बॅंकेने आपल्या व्यवसायापैकी काही भाग विकल्यास त्यातून हवे तेवढे भांडवल मिळविणे कठीण जाईल. सरकारने गेल्या महिन्यात सातशे अब्ज डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातील २५ अब्ज डॉलर्सचे पॅकेज या बॅंकेला दिले जाण्याची शक्यता आहे. बॅंकेला स्थावर मालमत्ता व क्रेडीट कार्ड क्षेत्रात वीस अब्ज डॉलर्सहून अधिक तोटा होण्याची शक्यता आहे. इतर बॅंकांनाही फटकाकाल अनेक बॅंकांच्या शेअर्सची घसरगुंडी उडाली. जे. पी. मॉर्गन चेज अँड कंपनीच्या शेअर्समध्ये १७.९, बॅंक ऑफ अमेरिका कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये १३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. डाऊ जोन्सचा निर्देशांकही ५.६ टक्क्यांनी घसरला आहे. कर्मचारी कपात जोरात या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बड्या वित्तीय संस्थांनी नोकरकपातीचा पर्याय अवलंबला आहे. जे.पी.मॉर्गने तीन हजार तर न्यूयॉर्क मेल्लन कॉर्पोरेशनने १८०० कर्मचार्यांना नारळ दिला आहे.