1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (20:41 IST)

जादा परताव्याचे आमिष भोवले उच्चशिक्षित तरुणाने 94 लाख गमावले

नाशिक : पार्ट टाईम जॉबच्या बदल्यात जादा पैसे कमावण्याचे आमिष दाखवून अनोळखी भामट्यांनी एका उच्चशिक्षित तरुणास 94 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हर्षल संजय शिंपी (वय 34, रा. सातमाऊली रेसिडेन्सी, अंबड, वृंदावननगर) हा तरुण उच्चशिक्षित आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून परदेशी कंपन्यांचे काम घरबसल्या करतो. त्यादरम्यान, त्याला एका टेलिग्राम आयडीवरून एक मेसेज आला. तो मेसेज त्याने वाचला. त्यानुसार अज्ञात इसमांनी त्याच्याशी संपर्क साधला. ॲमेझॉनच्या प्रॉडक्टचे मार्केटिंग केले, तर त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो, असे आमिष दाखविले.
 
त्यानुसार फिर्यादी शिंपी याने अज्ञात भामट्याने सांगितलेल्या स्कीमसाठी काही रक्कम गुंतविली. त्यानंतर गुंतविलेल्या रकमेवर काही दिवसांनी त्याला काही पैशांचा परतावा मिळाला. त्यामुळे त्याचा या भामट्यांवर विश्वास बसला. काही दिवसांनी अज्ञात भामट्यांनी त्याला आणखी रक्कम गुंतविण्यासाठी प्रवृत्त केले, तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतविल्यास त्यातूनही बऱ्यापैकी परतावा मिळू शकेल, असे त्याला सांगितले.
 
त्यासाठी अज्ञात भामट्यांनी एक फेक डॅशबोर्ड बनविला. त्या डॅशबोर्डवर शिंपी यांना आपण गुंतविलेल्या पैशांचा लेखाजोखा दिसत होता, तसेच गुंतविलेल्या पैशांवर परतावाही मिळत असल्याचे त्या डॅशबोर्डच्या माध्यमातून लक्षात येत होते. तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेवर मिळालेल्या जादा परताव्याची रक्कम मिळविण्यासाठी संशयितांनी फिर्यादी शिंपी यांना आणखी काही रक्कम वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांवर जमा करण्यास सांगितली. त्यानुसार शिंपी यांनी दि. 15 ते 20 नोव्हेंबर यादरम्यानच्या कालावधीत 94 लाख 13 हजार 441 रुपये जमा करूनही संशयितांनी पुन्हा पैशांची मागणी केली. त्यामुळे या व्यवहारात काही तरी गडबड असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.
 
त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दाखल केली. त्यामुळे संबंधित बँकांमधील पैशांचे व्यवहार हे ब्लॉक करण्यात आल्यामुळे ही रक्कम शिंपी यांना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.