बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 मार्च 2024 (10:54 IST)

भागवत बंधुंचे पैशांसाठी अपहरण अन्‌ सुटका; एकाला अटक !

arrest
नाशिक : माऊली मल्टीस्टेट व संकल्पसिद्धीमध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणातील संशयित विष्णू व रुपचंद भागवत बंधूंचे अपहरण करण्यात आले असता, गुरुवारी  दोघांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या पथकाने एकाला अटक केली असून, सरकारवाडा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
रुपचंद रामचंद्र भागवत (रा. गवंडगाव, ता. येवला) यांच्या फिर्यादीनुसार, विष्णू भागवत व रुपचंद भागवत हे बुधवारी (ता. २८) नाशिक जिल्हा न्यायालयात कामकाजानिमित्ताने आले होते. रात्री सात ते आठ वाजेच्या दरम्यान दोघेही पायी सीबीएस चौकात आले असता, त्यावेळी काळ्या रंगाच्या स्कोडा कारमधून (एमएच ०४ डीएन९६७७) आलेल्या संशयितांनी दोघांना बळजबरीने बसवून अपहरण केले.
 
स्कोडा कारसह यावेळी एक एक्सयुव्ही व पांढऱ्या रंगाचीही कार होती. भागवत बंधूचे अपहरण करून वाहने त्र्यंबकेश्वर मार्गे वाडिवर्हेवरून मुंबई-आग्रा महामार्गने मुंबईकडे गेली. संशयितांनी यावेळी भागवत बंधुंकडे ४ कोटी 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास दोघांना जीवे मारण्याचीही धमकी संशयितांनी दिली.
 
घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांसह शहर गुन्हेशाखेच्या पथकांनी संशयितांच्या माग काढत तपास सुरू केला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात पैशांसाठी अपहरण व डांबून ठेवल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी वेदांत येवला (वय: अंदाजे २५ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
 
बुधवारी (ता.२८) रात्री अपहरण केल्यानंतर, संशयितांनी रुपचंद भागवत यास पैशांची तजवीज करण्यासाठी लोणी (ता. राहाता, जि. अहमदनगर) येथे सोडले. रुपचंद याने सुटका झाल्यानंतर नाशिक गाठून सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले. तर, दुपारी विष्णू भागवत यासही संशयितांनी राहाता (जि. अहमदनगर) येथे सोडून दिले. तोही रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाला.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor