अकोला : पुराच्या पाण्यात अख्खी रात्रं फांदीला धरून काढली, 65 वर्षांच्या आजीची 18 तास मृत्यूशी झुंज
Photo- NITESH RAUT/BBCसध्या अकोला जिल्ह्यातील वत्सला या 65 वर्षीय आजीच्या धाडसाचं कौतुक होत आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतरही धीर न सोडता झाडाच्या फांदीचा आसरा घेत या आजीने 18 तास पाण्याच्या प्रवाहात काढले आहेत.
अकोल्यात संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच ऋणमोचन या गावात आलेल्या पुरात ही आजी वाहून गेली होती. दूरपर्यंत वाहून गेलेल्या आजीने झाडाच्या फांदीचा आसरा घेतला.
तब्बल 18 तास झाडाच्या फांदीला पकडून आजीची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर या आजीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. वत्सला राणे असं या आजीच नाव आहे. त्या आपातापा या गावातील रहिवाशी आहेत.
नेमकं प्रकरण काय?
वत्सला राणे या अकोला जिल्ह्यातील आपातापा या गावाच्या या गावातील रहिवाशी आहेत. त्या अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथे दर्शनासाठी गेल्या होत्या.
दरम्यान, पूर्णा नदीच्या काठावर त्या पाय धुण्यासाठी उतरल्या. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळं पाण्याच्या प्रवाहात त्या वाहात गेल्या.
आजीला वाहत जाताना तरुणाने पाहिले आणि त्याने आजीला वाचवण्याचा प्रयत्न केला. आजीला वाचवण्यात तरुण अपयशी ठरला.
आजीचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. अखेर एन्डली गावात एका बकऱ्या चारणाऱ्या युवकाला त्या आढळून आल्यास. झाडाच्या फांदीचा आडोसा घेऊन त्या पाण्यात अडकल्याच त्याला दिसून आल्या.
त्याने आजी अडकल्याची बातमी तात्काळ गावकऱ्यांना कळवली. घटनास्थळी गावकरी पोहचले आणि आजीला दोराच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
गावकऱ्यांनी आजीला घटनाक्रम विचारला तेव्हा ऋणमोचन पासून एन्डली गावापर्यंत पाहून आल्याचं आजीने गावकऱ्यांना सांगितले. हे अंतर दीड किलोमिटर इतकं असल्याचं गावकऱ्यांनी सांगितले.
या आजी सुखरूप त्यांच्या घरी परतल्या आहेत. मात्र त्यांच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक केलं जातं आहे.