मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (18:26 IST)

आजपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त

market
राज्यातील करोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्यात यापूर्वीच १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाटय़गृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्नसमारंभासाठी दोनशे तर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. मात्र अजूनही राज्यात ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे बंधन आहे. 
 
राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उपाहारगृहे, चित्रपट व नाटय़गृहे आदी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मुभा दिली जाईल. मात्र गेल्या महिनाभरात राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून रविवारी आतापर्यंतची सर्वात कमी अशी ४०७ रुग्णांची नोंद झाली.
 
राज्याच्या लसीकरणाच्या सरासरीपेक्षा म्हणजेच ७० टक्केपेक्षा अधिक लसीकरण (दुसरी मात्रा) झालेल्या जिल्हयातील बहुतांश सर्वच निर्बंध हटविण्यात येणार आहेत.
 
मुंबईतील सर्व व्यवस्थापनाच्या, शिक्षण मंडळांच्या, माध्यमांच्या शाळा बुधवारपासून पूर्ण क्षमतेने भरणार आहेत.  
 
काळजी घेण्याच्या सूचना
 
* सहव्याधी किंवा गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांकडे पालकांचे संमतीपत्र असणे बंधनकारक असेल.
* विद्यार्थ्यांना सर्दी, घसादुखी अशी करोनासदृश्य लक्षणे आढळल्यास पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये.
* शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान तपासावे.
* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के आवश्यक आहे.
* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण असावे.
* विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी शाळांमध्ये शिबिरांचे आयोजन करावे.
* शाळेत मधली सुट्टी असेल व मधल्या सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल.
* विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी खासगी बससेवा व बेस्ट बसमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी.
* मैदानी खेळ व कवायतींच्या वेळी मुखपट्टी बंधनकारक नसली तरी वर्गात, शाळेच्या बसमध्ये, शालेय परिसरात मुखपट्टी बंधनकारक आहे.