शरद पवार यांनाच मुख्यमंत्री होण्याची घाई झाल्याची दिसत आहे; चंद्रकांत पाटीलांचा टोला!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजकरणात चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना टोला लगावला.
राज्यात पवार ज्या पद्धतीने सक्रिय झाले आहे. त्यावरून पवार यांनाच मुख्यमंत्री होण्याची घाई झाल्याचे दिसत आहे,असा आरोप पाटील यांनी केला. मात्र पवार यांना घाई झाली असली तरी उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणालाच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देणार नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे त्यांच्या जागी त्यांच्या घरातील व्यक्तींची नावे अधून-मधून चर्चेत येत आहेत. हे चित्र पाहता राज्याच्या प्रत्येक विषयात ठाकरे सरकारला पवार यांचे मार्गदर्शन घेण्याची गरज पडत असल्याचे दिसत असून शिवसेनेवर इतकी वाईट वेळ यापूर्वी कधीही आली नव्हती, अशी टीका पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकार एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढू शकले नाही. त्यामुळे एसटी बंद असल्याने सामान्य लोकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.
उत्तर प्रदेशात शिवसेना निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. यावरही पाटील यांनी भाष्य केले. महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढण्याचा शिवसेनेचा अनुभव वाईट आहे. कितीही निवडणुका लढल्या तरी शिवसेना अपयशी ठरते, असे पाटील म्हणाले. तसेच गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला निवडणूक लढवण्यात कोणत्या अडचणी येणार नाहीत. मात्र पंजाबमध्ये निवडणूक लढणे सोपे नाही , असेही पाटील म्हणाले.