1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (09:20 IST)

किसान लाँग मार्च अखेर स्थगित अनेक मागण्या मान्य

नाशिकमधून निघालेला किसान लाँग मार्च अखेर स्थगित झाला आहे. यावेळीही गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत काढली आहे. आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करण्याचं लेखी आश्वासन सरकारकडून गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल हे सरकारकडून किसान सभेच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी वाडीव-हे शिवारात दुपारी दाखल झाले होते. मंत्र्यांकडून शिष्टाई सुरू होती. सायंकाळी पाच वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत किसान सभेचे नेते व मोर्चाचे पदाधिका-यांसमवेत दोन्ही मंंत्र्यांसह जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत चर्चा केली. पाच तास चाललेल्या या वादळी बैठकीत अखेर तोडगा काढण्यास दोन्ही मंत्र्यांना यश आले. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर आमदार जीवा पांडू गावीत यांनी मोर्चा स्थगित केल्याची घोषणा केली. बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली असून वनहक्क जमिनीचे दावे येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनयांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी निराधारांचे पेन्शन वाढवणार, पॉलिहाऊस शेड शेतकऱ्यांना दिलासा देणार,परभणीतील विमा योजनेतील वंचित शेतकऱ्यांना न्याय देणार , वनाधिकार, दुष्काळ, रेशन, सिंचन प्रश्नांवरील लेखी मागण्या मान्य ,देवस्थान जमिनीसाठी कायदा करणार आदी प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत.