मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात; ५ ठार, १५ जखमी
मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात तब्बल ५ जण ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. यातील ४ जण गंभीर जखमी असल्याचे समजते. जखमींना मालेगाव जवळील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. टेम्पोत एकूण ३० जण असल्याचे सांगितले जात आहे. बन्सीलाल राघो पाटील, कांताबाई पोपट पाटील सुनिता शिवलाल पाटील, आबाजी जालम पाटील, रत्नाबाई कांतीलाल पाटील, बळीराम रामचंद्र पाटील, वैष्ण सुहालाल पाटील, पोपट महादू पाटील, गोविंदा रतन पाटील, अनुसुयाबाई रतन पाटील, विजय रामराव पाटील
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावहून काही जण मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेरावाच्या दर्शनासाठी आले होते. तेथे दर्शन आणि गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व जण टेम्पोने चाळीगावकडे परत जात होते. त्याचवेळी गिगाव फाट्याजवळी टेम्पो आणि पिकअप यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की टेम्पो पलटी झाला. त्यामुळे टेम्पोतील ५ जण जागीच ठार झाले तर १५ जण जखमी झाले. यातील ४ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. टेम्पोला मागून धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शिंचे म्हणणे आहे. टेम्पोतील सर्व जण हे चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा गावचे असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य केले. जखमींना टेम्पोतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. काहींनी तातडीने पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस पथक आणि अॅम्ब्युलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्यांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.