शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मार्च 2024 (08:39 IST)

शरद पवारांचा भाजपला दे धक्का ; 'हा' बडा नेता हाती घेणार तुतारी, लवकरच होणार पक्षप्रवेश

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
 
विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवसमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे.
 
दरम्यान, मोहिते पाटलांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळं आता धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
 
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदावारी न दिल्यामुळं मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या मतदारसंघात मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. कोणत्याही स्थितीत लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. तर काही कार्यकर्ते मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. त्यामुळं मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 
 
Edited by Ratnadeep Ranshoor