मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (08:54 IST)

नगर जिल्हा रुग्णालय अग्नितांडव : पोपटराव पवारांचा जबाब नोंदवला जाणार

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविडच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या दाखल गुन्ह्याचा तपास तांत्रिक मुद्यांवर आहे. यामुळे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासमोर तांत्रिक मुद्यांमधील त्रुटींचा शोध घेत पुरावे उभे करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले  आहे. या बिशन आगीची घटना मोठी असल्याने गुन्ह्यात तपासाची व्याप्ती देखील मोठी आहे. या घटनेच्या दाखल गुन्ह्यात पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह सुमारे 100 पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मिटके यांनी दिली आहे.
 
जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपासाच्या सुरूवातीला वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका, अशा चार जणांना अटक केली आहे. या घटनेतील निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन घेतला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी सुरेश ढाकणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेत दाखल गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या कार्यकर्तव्यातील हलगर्जीपणाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके या गुन्ह्यात तांत्रिक पातळीवर तपास करत असल्याने गती मिळताना दिसत नाही. तांत्रिक पातळीवर तपास करताना त्यातील त्रुटी शोधून गुन्ह्यात दोषसिद्धता करायची आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याची प्रतिक्रिया उपअधीक्षक मिटके यांनी दिली.