शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 मे 2023 (07:50 IST)

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटकडून राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजन

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट च्या वतीने राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मुंबई येथील बिकेसी जीओ सेंटर येथे १५ ते १७ जून दरम्यान आयोजित या संमेलनात देशातील 4300 आमदार सहभागी होणार असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगिण शाश्वत विकास हा उद्देश घेऊन आयोजित या संमेलनात लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, लोकसभा सभापती ओम बिर्ला मार्गदर्शन करणार आहे. संमेलनातून आमदारांना त्यांच्या मतदारसंघात शाश्वत स्वरूपाचा सर्वांगीण विकास साधण्याची नवचेतना, नवप्रेरणा, व्यापक दृष्टी आणि निश्चित दिशा मिळणार आहे. या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या राज्यातील आमदारांमध्ये एकमेकांमध्ये संवाद घडवणे, लोकशाहीला सशक्त करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. प्रत्येक सत्रात 50 आमदार चर्चा करणार असून विकासाच्या दृष्टीने विचारांची देवाण घेवाण या माध्यमातून केली जाणार आहे. 
 
यावेळी बोलतांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत सभापती, उपसभापती पदाच्या खुर्चीचा मान राखला गेला पाहिजे मात्र कुठेतरी लोकशाही मुल्यांचा विसर पडतो आहे. पक्षीय हेवे दावे बाजूला ठेवून राष्ट्रनिर्माणात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे आणि यासाठीच एमआयटी पुणे यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.  लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन करण्याचे नियोजीत केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
 
ओबामांची उपस्थिती शक्य
राष्ट्रीय विधायक संमेलनाचे उदघाटन अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. आयोजकांकडून तसे प्रयत्नही सुरू आहेत मात्र ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तारखा जुळत नसल्याने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 
या विषयात होणार चर्चा
शाश्वत विकासाची साधने व प्रभाव
आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार
मतदारसंघ विकसित करण्याची कला
शेवटच्या व्यक्तीचे कल्याण

Edited By-Ratnadeep Ranshoor