साईभक्तांना सूचना देणारे फलक, सभ्य कपडे घालून मंदिरात प्रवेश करा
साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र क्षेत्रात प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीस अनुसरुन अथवा सभ्यतापूर्ण वेशभूषा परिधान करण्याची विनंती आहे. अशा सूचना देणारे फलक साई संस्थानानं मंदिर परिसरात उभे केले आहेत.
मंदिर परिसरात येताना भाविकांनी सभ्य कपडे घालावे आणि मंदिराचे पावित्र्य भंग होणार नाही, अशा सूचना देणारे फलकच आता शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात उभे करण्यात आले आहेत.
भक्तांनी भारतीय अथवा सभ्य पोषाख धारण करावा, या साई संस्थानाच्या सूचनांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतलाय. ही सक्ती करताना अर्धनग्न फिरणार्या पुजार्यांकडे कुणाचं लक्ष का जात नाही, अशी सक्ती फक्त भक्तांनाच का, पुजाऱ्यांना का नाही? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
भक्तांना विशिष्ट कपड्यांसाठी सक्ती म्हणजे मुलभूत अधिकारांचा भंग असल्याचं असून कुणी कुठले कपडे घालावे, हे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, असं देसाईंचं म्हणणं आहे.
देशभरात यावर चर्चा सुरू असली तरी साई संस्थानने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मंदिर परिसरात सूचना देणारे फलक उभे केले आहेत.