1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (15:39 IST)

पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचा प्रहार वाड्या वस्तीवर पोहचला

bachhu kadu
आमदार बच्चू कडू यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी रविवारी आमदार रवी राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. २३ ऑक्टोबर रोजी भादंविच्या कलम ५०१ अन्वये राणांविरोधात ती एनसी दाखल करण्यात आली.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बच्चू कडू यांनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे.
एखाद्याच्या लग्नात गेलं तरी लोक खोक्यावरुन बोलतात, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. यावर पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचा प्रहार वाड्या वस्तीवर पोहचला आहे हे ठळकपणे अधोरेखित झाले आहे, असं रविकांत वरपे यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणी करु नये. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले ७ ते ८ आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच एक नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास आपण धमाका करणार असल्याचा इशारा देखील बच्चू कडू यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor