शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (21:51 IST)

सप्तश्रृंगी देवीचं मंदिर घटस्थापनेला खुले होणार

saptashringi
देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे मंदिर घटस्थापनेला खुले होणार आहे. मागील 45 दिवसापासून सप्तश्रृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी बंद आहे. याआधी मंगळवार अर्थात उद्यापासून भाविकांसाठी मंदिर खुले होणार होते. परंतु अद्यापही काही काम अपूर्ण असल्याने मंदिर खुले होण्याचा मुहूर्त 21 दिवस पुढे ढकलला आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर भगवती मूर्तीचे संवर्धन आणि आणि गाभारा देखभाल दुरुस्तीसाठी 45 दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु दीड महिन्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने मंदिर आता पितृपक्षानंतर मंदिर खुले होणार आहे. सहा ते आठ सप्टेंबर या तीन दिवसात श्री क्षेत्र काशी येथील धर्मशास्त्र पारंगत पंडित गणेश्वर शास्त्री, द्रविड नाशिक येथील शांताराम शास्त्री भानुसे, सप्तशृंगगड येथील पुरोहित, संघाच्या मार्गदर्शनाखाली भगवती मंदिरात सहस्त्रकलश, महास्नपन विधी, संप्रोक्षण विधी, उदक शांती, शांती होम आदी धार्मिक पूजा विधींचे आयोजन महाराष्ट्रातील तज्ज्ञ पुरोहितांकडून करण्यात येणार आहे.  संपूर्ण पितृपक्षात 1600 देवी अथर्वशीर्ष पाठांचे अनुष्ठान तसेच ज्योत पेटून घेऊन जाणाऱ्या भाविकांसाठी पहिल्या पायरी येथे व्यवस्था करण्यात येणार आहे.
 
सप्तश्रृंगीच्या या नांदूरी गडावर साधरणतः 600 छोटे मोठे व्यावसायिक असून येणाऱ्या भाविकांवरच येथीले सर्व उद्योगधंदे अवलंबून असल्याने गावचे अर्थकारण पूर्णतः ठप्प झाले आहे. फुलविक्रेते, पूजासाहित्य-प्रसाद विक्रेते, हॉटेल्स-लॉज, टॅक्सीचालक अशा सर्वांचाच यात समावेश आहे.
 
काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी मंदिर मार्गावर पुराच्या पाण्यामुळे प्रदक्षिणामार्गाचे नुकसान झाले होते तर काही भाविक देखील जखमी झाले होते. त्यानंतर सप्तशृंगी गडावरील मूर्ति देखभाल कामासाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर या 45 दिवसांच्या कालावधीत या मंदिराची डागडुजी करण्यात येणार होती. त्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार होते.