सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (10:48 IST)

हे आहेत मुंबई, नाशिक मनपा सह नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर

महाराष्ट्रातील एकाचवेळी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक यासारख्या महापालिकांच्या महापौरपदांची निवडणूक झाली आहे. यात महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप सत्तास्थापनेपासून दूर जरी असला तरीही मुंबई सोडून महत्वांच्या शहरातील मनपावर महापौरपदांवर भाजपचे उमेदवार निवडले गेले आहेत. 
 
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर विराजमान झाल्या आहेत. भाजपने आधीच माघार घेतल्यामुळे किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपमहापौरपदी सेनेच्याच सुहास वाडकर यांची निवड झाली आहे.
पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली. मोहोळ यांना 97 मतं मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश कदम यांना 59 मतं पडली. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे पुणे महापौरपदाच्या निवडणुकीत महासेनाआघाडी पाहायला मिळाली.
 
उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत महासेनाआघाडीच्या बळावर शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन महापौर झाल्या. आशान यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला.
 
पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची निवड झाली. त्यांना 81 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती उर्फ माई काटे यांना 41 मतं पडली. भाजपच्या तुषार हिंगे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.
 
नाशिक महापौरपदाच्या निवडीत  महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सतीश कुलकर्णी हे नाशिकचे 16 वे महापौर ठरले आहेत.
 
नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या संदीप जोशी यांची निवड झाली आहे. भाजपच्या संदीप जोशी यांना 104 मतं, तर काँग्रेसच्या हर्षदा साबळे यांना 26 मतं मिळाली. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर भाजपच्या मनिषा कोठे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. 
 
चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांची निवड झाली. कंचर्लावार यांना 42 मतं, तर काँग्रेस उमेदवार कल्पना लहामगे यांना 22 मतं मिळाली. 2 नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. तर उपमहापौरपदी भाजपच्या राहुल पावडे यांचा विजय झाला. 
अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे चेतन गावंडे तर उपमहापौरपदी भाजपच्या कुसुम साहू यांची निवड झाली. 
 
अकोला महापालिकेत महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने, तर उपमहापौरपदी भाजपचे राजेंद्र गिरी विजयी झाले आहेत.
 
लातूरचं महापौरपद आता भाजपकडून काँग्रेसकडे,  काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे लातूरचे नवीन महापौर झाले आहेत. भाजपचे दोन नगरसेवक फोडून काँग्रेसने पालिकेवर ताबा मिळवला.
 
राज्यातील निवडणून आलेले महापौर आणि उपमहापौर पुढील प्रमाणे :
 
मुंबई – किशोरी पेडणेकर (शिवसेना), उपमहापौर – सुहास वाडकर (शिवसेना)
पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप), उपमहापौर – सरस्वती शेंडगे (भाजप)
पिंपरी चिंचवड– उषा उर्फ माई ढोरे (भाजप), उपमहापौर – तुषार हिंगे (भाजप)
नाशिक – सतीश कुलकर्णी (भाजप), उपमहापौर – भिकू बाई बागुल (भाजप)
उल्हासनगर – लीलाबाई आशन (शिवसेना) – महासेनाआघाडी
नागपूर – संदीप जोशी (भाजप), उपमहापौर – मनिषा कोठे (भाजप)
चंद्रपूर – राखी कंचर्लावार (भाजप), उपमहापौर – राहुल पावडे (भाजप)
अमरावती – चेतन गावंडे (भाजप), उपमहापौर – कुसुम साहू (भाजप)
अकोला – अर्चना मसने (भाजप), उपमहापौर – राजेंद्र गिरी (भाजप)
लातूर – विक्रांत गोजमगुंडे (काँग्रेस), उपमहापौर – चंद्रकांत बिराजदार (भाजप बंडखोर काँग्रेसच्या पाठिंब्यावर)
परभणी – अनिता सोनकांबळे (काँग्रेस), उपमहापौर – भगवान वाघमारे (काँग्रेस)